
रतन टाटा यांचे कंपन्यांना खडे बोल- संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच का तुमची नीतिमत्ता?
रतन टाटा यांचे कंपन्यांना खडे बोल- संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच का तुमची नीतिमत्ता?
मुंबई (तेज समाचार डेस्क) : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं जनजीवन ठप्प आहे. लाॅकडाऊनच्या काळात अनेक बड्या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. याचा परिणाम म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. काही कंपन्यांनी पगार कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत टाटा म्हणाले की, ही तीच लोकं आहेत. ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय. तुमच्या कंपनीच्या यशात महत्वाचा वाटा असलेल्या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडत आहात. ही तुमची नितिम्मतेची व्याख्या आहे का?, अशा शब्दात टाटा यांनी कंपन्यांना खडे बोल सुनावले आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा अनेक कंपन्यांनी हजारो लोकांना कामावरून काढून टाकलं. यामुळे खरंच तुमचा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल विचारत टाटा पुढे म्हणाले की, या वातावरणात तुम्ही संवेदनशील झाला नाहीत तर तुम्हाला लपण्यासाठी किंवा पळण्यासाठी कोणतीही जागा उरणार नाही. दरम्यान, याउलट परिस्थिती स्वीकारणं कधीही चांगलं राहील. कारण तुम्ही जिथे जालं तिथं महामारीने नुकसान केलेलंच असेल. म्हणून तुम्हाला काही गोष्टींमध्ये बदल करायला हवा. या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, असा सल्लाही टाटा यांनी या मुलाखतीदरम्यान दिला आहे.