यस बँकेत अडकले नाशिक महानगरपालिकेचे 324 कोटी

Featured नाशिक
Share This:

नाशिक (तेज समाचार प्रतिनिधि). रिझर्व्ह बँकेने नुकतेच आर्थिक निर्बंध ज्या बँकेवर जाहीर केले त्या येस बँकेमध्ये नाशिक महानगर पालिकेचे ३२४ कोटी रुपये अडकले आहेत. २१ सप्टेंबर २०१८ रोजी साबद्रा अँड साबद्रा या ऑडिट फर्मने या बँकेत पैसे ठेवू नका असा स्पष्ट इशारा ऑडिट रिपोर्टद्वारे स्मार्ट सिटी डायरेक्टर बोर्डासमोर सादर केला असतांनाही घरपट्टी व पाणीपट्टीचे १३६ कोटी रुपये + शासनाकडून आलेल्या अनुदानाचे १७३ कोटी रुपये व स्मार्ट सिटीचे १५ कोटी रुपये असे ३२४ कोटी रुपये हे आता बुडाल्यात जमा आहेत ! त्यामुळे शहरातील विविध विकासाची कामे, कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आलेले आहेत.

– मनमानी कारभार
ऑडिट रिपोर्ट द्वारे मनपाला वेळीच जागे करण्याचा प्रयत्न केला म्हणून साबद्रा अँड साबद्रा या ऑडिटर फर्मककडून त्वरेने काम काढून घेण्यात आले. ते काम आपल्या विश्वासातील सी.आर. सखदेव अँड कंपनीला देण्यात आले. या कंपनीचे सी. ए. तांबूळवाडीकर यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता “आठवत नाही, आकडे सांगता येणार नाहीत” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली ! गेल्या काहीवर्षांपासून मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची शासनाने दखल घ्यावी व या बेकायदेशीर कामांना लगाम लावावा एव्हढीच नाशिककरांची रास्त अपेक्षा आहे.

– सरकारी बँकांमध्ये ही बुडल्या ठेवी
याआधी सहकारी बँकांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या ठेवी बुडाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असतांना आणि सहकारी व खाजगी बँकांमध्ये पैसे न ठेवता सरकारी बँकांमध्ये ते ठेवण्यात यावेत असा स्पष्ट आदेश असतांना हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून येस बँकेत ठेवले गेले ? कोणाचे हात ओले झाले याचीही चौकशी झाली पाहिजे.

काँग्रेस पक्षाचा एक जबाबदार गटनेता म्हणून वेळोवेळी महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध मी प्रश्न विचारत असतो. आवाज उठवत असतो… या प्रकरणीही मी वेळोवेळी आवाज उठवला आहे. सत्ता व अधिकारामुळे अंध झालेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मनमानी व भ्रष्ट कारभार आपण अजून किती दिवस चालू देणार हा खरा प्रश्न आहे. शासनदरबारी किंवा वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागल्यास ते करण्यासही आता आम्ही मागेपुढे बघणार नाही… जनतेच्या पैशाची ही लूट थांबली पाहिजे !

-शाहू खैरे, नगरसेवक व काँग्रेस गटनेता,
नाशिक महानगरपालिका, नाशिक

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *