
यावल: पाच लाखांच्या सागवानाच्या पाट्या जप्त
यावल: पाच लाखांच्या सागवानाच्या पाट्या जप्त
किनगाव परिसरातून दररोज होते सागवानी लाकडाची मोठी तस्करी तस्करी
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): तालुक्यातील डांभुर्णी ते डोणगाव रस्त्यावर पोलिसांच्या पथकाने एका वाहनाचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड पाट्या जप्त केल्या आहेत. तर वाहनचालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला आहे. किनगाव परिसरातून दररोज सागवानी लाकडाची मोठी तस्करी भरदिवसा सर्रासपणे होत असल्याने वन विभागाचा जाणीवपूर्वक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सागवानी लाकडाचा माल पकडला त्या ठिकाणापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर तापी नदी पुलाजवळ फॉरेस्ट विभागाचे तपासणी नाका सुद्धा आहे तेथून हा माल नियोजनबद्धरीत्या पसार झाला असता असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचार्यांसह किनगाव परिसरात आज दिनांक १५ जून रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना डांभुर्णी डोणगाव रस्त्यावर एम. एच. झिरो. 5-R 3719 हे टाटा कंपनीचे चार चाकी वाहन वेगाने जात असल्याचे त्यांना दिसून आले. धनवडे यांना याबाबत संशय आला. यामुळे या वाहनाचा पोलीसांनी पाठलाग केला. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर एका ठिकाणी हे वाहन रस्त्यावर सोडून त्याचा चालक पसार झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी पोलीसांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता त्या चारचाकी वाहनांमध्ये अत्यंत महागड्या नविन सागवानी लाकडाच्या 20 पाट्या त्यात त्यांना आढळून आल्या. त्याची किंमत बाजार भावाप्रमाणे अंदाजे पाच लाख रुपये तर, सरकारी किंमत सुमारे अडीच लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यावल पोलीसांनी हे वाहन जमा केले असुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेबुब तडवी, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, चालक भैय्या पाटील, मदतनीस युवराज घारू यांच्या पथकाने ही करवाई केली. यावल पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे , वाहन चालक भरत बाविस्कर, अशोक मराठे, वनपाल असलम खान यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या सागवानी लाकडाचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान दिवसा ढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाची खुलेआम तस्करी होत असतांना यावल पश्चिम वन विभागाचे याकडे दुर्लक्ष कसे ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच वन विभागाचे गस्ती पथक आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा झोपलेले आहेत का ? असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे
एका वाहनाचे दोन क्रमांक
पकडलेल्या वाहनाचे दोन क्रमांक मिळून आले आहे. यात पहिला बोगस क्रमांक (एम.एच. 05 आर 19 ) आणि (एम.एच. 13 ए.झेड. 3380 ) असे आढळून आलेत. दोन क्रमांक असलेल्या चारचाकी वाहनांचा वापर करून सागवान लाकडांची तस्करी करण्यात येत आसावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेमुळे सातपुडा पर्वतातील जंगलातून बेसुमार जिवंत वृक्षतोड केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत असून हा सागवानी म** कोणाचा आणि हामाल कुठून कुठपर्यंत कोणाकडे जात होता इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून कारवाई होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे यावल पोलीस आणि वन विभागावर राष्ट्रीय दबाव येणार आहे का असे सुद्धा बोलले जात आहे.