पुणे : माजी सैनिक दिन उत्साहात झाला साजरा

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क). सैन्य दलातील माजी सैनिकांनी बजावलेला सेवेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारी हा दिवस माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलातील प्रथम कमांडर-इन-चीफ (सी-इन-सी) ओबीई, फील्ड मार्शल केएम करिअप्पा  सेवानिवृत्त झाले होते. फील्ड मार्शल करिअप्पा यांनी आपल्या कारकीर्दीत इराक, सिरिया, इराण आणि बर्मामध्ये अनेकवेळा  कीर्ती आणि यश संपादन केले होते. फील्ड मार्शल करियप्पा 15 जानेवारी 1949 ते 14 जानेवारी 1953 पर्यंत लष्करप्रमुख होते. त्यांच्या उत्कृष्ट कारकीर्दीसाठी आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शलचा दर्जा देण्यात आला. ते निवृत्तीनंतरही त्यांनी सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा या सैन्यदलांना भेटी दिल्या. वयाच्या 94 व्या वर्ष 15 मे 1993 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शेवटच्या क्षणापर्यंत ते सक्रिय होते.

पहिला सशस्त्र दल माजी  सैनिक दिन 14 जानेवारी 2017 रोजी आयोजित करण्यात आला होता. माजी सैनिक आणि सेवेत असणाऱ्या कर्मचार्‍यांमधील संबंध अधिक दृढ करणे हे या दिनाचे उद्दीष्ट आहे. या मंचाच्या माध्यमातून माजी सैनिकांचे निवृत्तीवेतन आणि हित तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संबधित समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न देखील केला जातो.
माजी सैनिक दिनानिमित्त लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती, जीओसी-इन-सी, दक्षिण कमांड आणि लेफ्टनंट जनरल बी टी पंडित, वीर चक्र (निवृत्त) यांनी देशसेवेत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना, पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारका येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

माजी सैनिक हे आपल्या सर्वांचा अभिमान तसेच सेवेत असणाऱ्या सैनिकांसाठी ते प्रेरणास्थानआहेत असे उद्गार आर्मी कमांडर ले. जनरल मोहंती यांनी काढले.  सैन्य त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आर्मी कमांडर यांनी यावेळी देशाच्या विविध युद्धात या माजी सैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, शूर, पराक्रमी आणि दृढनिश्चयी माजी सैनिक हे नेहमीच सशस्त्र सैन्याच्या सध्या सेवेत असणाऱ्या आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहेत.

सशस्त्र सेना, माजी सैनिक ज्येष्ठ दिनानिमित्त आमच्या या सर्व माजी सैनिकांच्या  नि:स्वार्थ  समर्पण वृत्ती आणि देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचा सन्मान करते असे ते म्हणाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *