महिला बचत गटाची बँक स्थापन करणार : मंत्री हसन मुश्रीफ

Featured महाराष्ट्र
Share This:

 

कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रातील माता-भगिनींना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटाची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्रातील महिला बचत गटाची चळवळ ही नुसती सरकारी काम किंवा अभियान म्हणून राहणार नाही. महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे हे काम लोकचळवळ म्हणून उभारूया, असेही ते म्हणाले. महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ग्रामविकास विभागांतर्गत उमेद संस्थेच्यावतीने आयोजित ऑनलाईन महिला मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. या मेळाव्याला राज्यभरातील दीड लाखाहून अधिक महिला कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महात्मा गांधींनी मांडलेले ग्रामविकासाचे विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. जोपर्यंत गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत विकास ही संकल्पनाच अपुरी असेल. गावानं खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर आधी महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झालाच पाहिजे. मुश्रीफ पुढे म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उमेद नवनवीन योजना आणत आहे . आपण सर्वांनीच या सगळ्याचा अंतर्मुख होऊन आढावा घेण्याची खरी गरज आहे . या चळवळीच्या माध्यमातून आपण काय मिळवलं, किती कुटुंबांना स्थैर्य मिळालं, किती कुटुंबे सुखी झाली, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे .भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याचा संदेश दिला होता. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसह खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधीजींनी दिला होता. गावाच्या गरजा गावातच पूर्ण व्हाव्यात आणि त्या माध्यमातून खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, हीच महात्मा गांधींची धारणा होती.

महिला बचत गटांच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी ७,७०० कोटी रुपये राज्य सरकार खर्च करीत आहे. या चळवळीच्या माध्यमातून पन्नास लाखाहून अधिक कुटुंबे जोडली गेली आहेत. असे असले तरी मायक्रो फायनान्ससारख्या दुष्टचक्रात महिला अडकल्यामुळे त्या रस्त्यावर येऊन मोर्चे काढत आहेत, याचा खेद वाटतो. या माता-भगीनीच्या समस्या जाणून घेऊन मायक्रो फायनान्सच्या चक्रव्यूहातून त्यांची सुटका करण्यासाठी आपण एक अभ्यासगट नियुक्त केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एखादेवेळी शासकीय पैसा खर्च नाही झाला तरी चालेल. परंतु या चळवळीच्या माध्यमातून कुटुंबेच्या कुटुंबे स्वतःच्या पायावर उभा राहतील, यासाठी काम करणे गरजेचे आहे. लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँकही स्थापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी स्वागत केले. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अतिरिक्त संचालिका श्रीमती मानसी बोरकर यांनी आभार मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *