नंदुरबार : महिलांनी घेतले मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे

Featured नंदुरबार
Share This:


नंदुरबार ( वैभव करवंदकर) नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते दहावीला अध्यापन करणाऱ्या सर्व महिला शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी युट्युब लाईव्हद्वारे मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .

मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी ‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ राष्ट्रीय अभियान अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाकडे लक्ष वेधले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि युनिसेफ यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी ह्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाड्यात, गावातील सर्व किशोरवयीन मुली तसेच माता पर्यंत हा विषय पोहचविण्याचे आवाहन केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी मासिक पाळी ह्या विषयावर वैद्यकीय दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती सांगून उपस्थितांशी संवाद साधला व या विषयाबाबत अधिक काम करण्यासाठी सर्वांना आवाहन केले.

महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. राठोड यांनी मासिक पाळी हा संवेदनशील विषय आहे. या विषयाबाबत गैरसमजुती व अंधश्रद्धा, आहेत, त्याचे निराकरण करावे, असे आवाहन केले.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे येथील उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. माध्य. शिक्षणाधिकारी मछिंद्र कदम यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी या विषयाची माहिती घेऊन शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचविण्याचे आवाहन केले . जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी देखील मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती देऊन दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याबाबत आवाहन केले. कार्यशाळेस तज्ञ सुलभक म्हणून डॉ.वनमाला पवार अधिव्याख्याता डायट नंदुरबार, विषय सहायक प्रकाश भामरे , नरेंद्र पाटील, श्रीमती गायत्री पाटील, सीमा पाटील यांनी काम केले. तसेच युनिसेफ मधून अपर्णा कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना विषयानुसार केस स्टडी सांगून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सूत्र संचलन, प्रास्ताविक डॉ.वनमाला पवार यांनी केले.

दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषय घेण्यात आले. त्यात मी माझे शरीर व समता, मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी बद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती, मासिक पाळी संदर्भात निर्माण होणारी आव्हाने व उपाय, मासिक पाळी काळात स्वच्छता पाळण्याच्या पद्धती व आरोग्यदायी सवयी, मासिक पाळीच्या काळात शोषक साहित्याचा वापर, किशोरवयीन मुली बरोबर संवाद व सकारात्मक वातावरण निर्मिती यासह सगळ्यात शेवटचे सत्र म्हणजे ज्या महिला प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले त्यांची येथून पुढे भूमिका काय असेल याविषयी रोडमॅप ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ऑनलाइन यू ट्यूब LIVE प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य महिला शिक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाचे संपूर्ण व्हिडीओ हे ‘डायट नंदुरबार’ या यूट्यूब चैनल ला प्रसारित करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ प्रत्येकी दोन दिवसाचे व्हिडिओ जिल्ह्यातील सात हजार महिलांनी पाहिलेले आहेत. या प्रशिक्षणाची व्हाट्सअप ग्रुप तसेच प्रतिसाद लिंक व चट बॉक्स मध्ये खूप बोलक्या व उत्तम प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील केंद्रप्रमुख श्रीराम शिरसाठ यांनी पाडळदा केंद्रात कोवीड 19 च्या नियमांचे पालन करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षिकाना प्रशिक्षण घेता यावे यासाठी शाळांमध्ये प्रोजेक्टची सुविधा उपलब्ध केलेली दिसून आली . धडगाव तालुक्यातील कात्री केंद्राचे केंद्रप्रमुख पी. बी. पटेल यांनी स्वयंप्रेरणेने स्वतः प्रशिक्षण घेऊन हा विषय केंद्रातील अंगणवाडी ताई यांच्या मदतीने सर्व किशोरवयीन मुलींपर्यंत पोचविण्याचा मनोदय व्यक्त केला. अतिदुर्गम भागातील अंगणवाडी सेविका यांनी घरात नेटवर्क नसल्या कारणाने टेकडीवर जाऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतांना दिसून आल्या. त्यांचे व्हाट्सअप्प ग्रुप वर शेअर केलेले फोटो खरोखर कौतुकास्पद आहेत.

दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील संपूर्ण टीमने प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी मेहनत घेतली. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण व विषय सहायक संदीप पाटील, प्रकाश भामरे यांनी युट्युब लाईव्ह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण टेक्निकल जबाबदारी स्वीकारून यशस्वीपणे हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेतले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता बी.आर.पाटील, पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे , तसेच सर्व विषय सहायक व पर्यवेक्षकीय यंत्रणेचे सहकार्य लाभले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *