
‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का?
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका वाढत चालला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे देशात 40 रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात देखील डेल्टा प्लस विषाणूचे 21 रूग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि इतर राज्यांना अलर्ट जारी केला आहे. हे सर्व सुरु असताना सर्वसामान्यांच्या मनात तिसऱ्या लाटेची भिती निर्माण झाली आहे.
तिसऱ्या लाटेची आताच काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवं. देशात अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. ती ओसरत आहे. अशा परिस्थितीत आपण निष्काळजीपणा करु नये. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबतचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असं जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे तज्ज्ञ डाॅक्टर अनुराग अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
डेल्टाचा कोणताही व्हेरियंट भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आपली सर्वात मोठी चिंता हीच आहे की, अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे आपल्याला अजूनही सतर्कच राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. डेल्टा प्लस विषाणू अधिक धोकादायक आहे. त्यावर औषधाची परिणामकता कमी असल्यानं वेळीच इलाज करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका वाढत असल्यानं, काही जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या स्तरावर देखील पुर्ण तयारी करण्यात येत आहे.