बंगालमध्ये मतदानावेळी हिंसा, सीआयएसफ जवानांनी केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

Featured देश
Share This:

 

कोलकाता  (तेज समाचार डेस्क):  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. ४४ जागांसाठी मतदान (Election) सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या १८ वर्षीय तरुणाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे. मतदान शांततेत पार पडावं म्हणून तैनात असलेल्या सीआयएसएपच्या जवानांचे शस्त्र हिसकावून घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सीआयएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. पाचही मृतदेह माथाभांगा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवालही मागवला आहे. केंद्रीय उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून शीतलकुचीमधील गोळीबाराची माहिती घेतली आहे. तसेच गोळीबार करण्यात आला तेव्हा काय परिस्थिती होती, गोळीबार का करावा लागला, गोळीबार करणं गरजेचं होतं का? याबाबतची माहिती जैन यांनी मागितली आहे. तसेच घटनास्थळाची व्हिडीओ रेकॉर्डिंगही मागवण्यात आली आहे.

दरम्यान, या हिंसेनंतर टीएमसीने एक प्रेस रिलीज जारी करून आरोपांवर आरोप केले आहेत. सकाळापासून भाजपचे कथित कार्यकर्ते लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. तसेच सीआरपीएफचे जवान भाजपला मतदान करण्यासाठी दबाव टाकत आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक २८५ मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. असं टीएमसीने म्हटलं आहे. तर विशेष पोलीस पर्यवेक्षक यांनी अहवाल तयार केला आहे. दोन गटांमध्ये हिंसा भडकली होती. त्यांना पांगवण्यासाठी सीआएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या जवानांच्याकडील शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलिंग अधिकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली होती, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *