शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी
( जळगाव तेज समाचार प्रतिनिधी) : मनपा हद्दीतील फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठ आणि दाणा बाजार या गर्दीच्या ठिकाणी ‘no vehicle zone’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही वाहनास मार्केटमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानुसार मनपा प्रशासनाने सोमवारी रात्री मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक चौकात, रस्ता तसेच गल्ली बोळात बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेर मध्ये सुरू असलेले सात दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन मंगळवारी संपले आहे. तसेच येथे उनलॉकच्या नियमांनुसार १४ जुलैपासून सर्व सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी केली. त्यांनी दिलेल्या आदेशनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी ‘no vehicle zone’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता १४ जुलैपासून फक्त वेळेनुसार माल वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच कागदपत्र तपासून आत प्रवेश मिळणार आहे.
एका बाजूनेच मिळणार वाहनांना प्रवेश
शहरातील सर्व व्यापारी संकुले, शॉपिंग मॉल्स बंदच राहणार आहे. तर उनलॉकप्रमाणे इतर दुकाने सम- विषम नियमानुसार सुरू असतील. त्यामुळे दाणा बाजार, सुभाष चौक आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी एका बाजूनेच वाहनांना प्रवेश मिळणार आहे.
विविध ठिकाणी लावले बॅरिकेट्स
त्यानुसार आता मार्केट मध्ये येण्यासाठी फक्त बेंडाळे चौकाकडून प्रवेश मिळेल. यामुळे मनपा प्रशासनाने चित्रा चौक, सराफ बाजार, टॉवर चौक, कोर्ट चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, सुभाष चौक आदी ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.