कोरोनारुपी संकटावर मात करण्यासाठी विरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे साकडे

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (वैभव करवंदकर) कुटुंबांसह समाज आणि जगाला कोरोनारुपी संकटातून बाहेर पडण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यात परम पूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी यांना विरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे साकडे घालण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.

कोरोनामुळे यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दोन्ही ठिकाणी होणारे उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी संपूर्ण प्रतिवर्षी श्रावण महिन्यात अखिल भारतातील वीरशैव लिंगायात गवळी समाजाचे आराध्य दैवत म्हणून परिचित असलेले परमपूज्य बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या चरणी अवघा समाज लीन होतो. दरवर्षी श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी महाराष्ट्रातील नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव तीर्थक्षेत्री आणि चौथ्या सोमवारी बिजेच्या दिवशी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील चीटगुप्पा या ठिकाणी गवळी समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने येत असतात.

यंदा मात्र कोरोनाने सर्व भाविकांच्या आनंद उत्सवावर विरजण पडले आहे. दोन्ही ठिकाणी होणारे उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत. श्रावण महिन्यात नंदुरबारसह धुळे, जळगाव जिल्ह्य़ातील भाविक सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या आरती निमित्त घरोघरी पूजन आणि महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत. शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून घरगुती स्वरूपात धार्मिक कार्यक्रम केले जातात. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तोरणमाळ येथील सातपुडा पर्वतरांगेत सिदाजीआप्पा देवर्षी यांनी बारा वर्ष तपस्या केल्याची नोंद आढळून येते. कोरोनारुपी संकटातून बाहेर पडण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यात परम पूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी यांना गवळी समाजातर्फे साकडे घालण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *