गोंधळाच्या वातावरणात उरकले पत्रकारांचे लसीकरण

Featured जळगाव महाराष्ट्र
Share This:

उद्धट भाषा, ढिसाळ नियोजनामुळे पत्रकारांची नाराजी

जिमाका यांनी दिलगिरी व्यक्त केली

जळगाव : फेब्रुवारी महिन्यापासून फ्रंट लाईन वर्कर मध्ये पत्रकारांचे लसीकरण व्हावे अशी मागणी असताना प्रलंबित राहिलेला हा विषय अखेर रविवारी ९ मार्च रोजी काही अंशी सुटला. जिल्हा प्रशासनाने चेतनदास मेहता रुग्णालयात पत्रकारांचे लसीकरण शिबीर भरविले. मात्र सकाळपासून केवळ गोंधळाच्या वातावरणात आणि कागदांच्या खेळखंडोब्यात लसीकरण कसेबसे उरकले गेले.

कोरोना महामारीने पूर्ण जगात थैमान घातले आहे. वर्षभरापासून कोरोना महामारीतही नियमितपणे बातमीदारी करणारे आणि विविध माध्यमांच्या कार्यालयात काम करणारे सर्व विभागांचे कर्मचारी अविरत कार्यरत होते. अनेक पत्रकारांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अशा परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना लांब ठेवणारी लस आली. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पहिली लस अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घेतली. प्रथम आरोग्य क्षेत्र नंतर फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण झाले. या फ्रंटलाईन वर्कर मंध्ये पोलीस, न्यायालय, महसूल आदी घटकांचा समावेश होता. मात्र पत्रकांरांचा समावेश झाला नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील पुढाकार घेतला नाही.

गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात सुमारे १२ ते १४ पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात कमी वयाचे म्हणजे ३४ वर्षे वयाच्या वृत्तवाहिनीच्या पत्रकार देखील होता. जिल्ह्यात अनेक पत्रकारांनी दुसऱ्या जिल्ह्यात तर काहींनी स्थानिक ठिकाणीच कशीबशी लस मिळविली. तर १ मे पासून ऑनलाईन नोंदणीचा मनस्ताप झेलत काहीनि लस घेतली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून सन्मानाने पत्रकारांना लस मिळालीच नाही.

१ मे रोजीपासून १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु झाले तेव्हाहि प्रशासन ढिम्म होते. सोशल मीडियात याविषयी नाराजी सुरु झाल्यानंतर मात्र प्रशासन जागे झाले. शनिवारी ८ रोजी तातडीने दुसऱ्या दिवशी लसीकरण शिबीर भरविण्याविषयी घाईघाईने नियोजन केले गेले. एका दिवसात अनेकांनी धावपळ करीत कागपत्रे जुळवून जिल्हा माहिती कार्यालयात कागद जमा केली. त्यातही जिल्हा माहिती कार्यालयाने सुरुवातीला संपादकीय विभागच सांगितलं होता. मात्र त्यावरदेखील टीका सुरु झाल्यावर इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली.

अनेक पोर्टल, यु ट्यूब चॅनेलच्या पत्रकारांना तर भारत सरकारचे नोंदणी प्रमाणपत्र असताना देखील राज्य शासनाचे प्रमाणपत्र आणा म्हणून परत पाठविले गेले. तर एकाला तर संपादकाचा शिक्का नाही म्हणून कागदपत्र घेतले गेले नाही. या सावळ्या गोंधळात लसीकरण सुरु झाले. रविवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. उशिराने महापौर जयश्री महाजन यांनी भेट दिली होती.

पत्रकारांना उद्धट वागणूक

जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकारांकडून फॉर्म भरून घेतले. या फॉर्मवर नंबर देखील टाकून दिले होते. मात्र या नंबरप्रमाणे न घेता सरळ कोणालाही लसीकरण केले जात असल्याने नाराजी व्यक्त झाली. एका कार्यकारी संपादकांनी तर संताप व्यक्त केला, त्यावेळी त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी उद्धट भाषा वापरून अरेरावी केली. त्यामुळे केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. यामुळे प्रशासनाचे नियोजन ढेपाळल्याचे स्पष्ट दिसून आले. तसेच, एकाच दैनिकाचे लोकांना एकाच दिवशी लस दिली तर होणाऱ्या रिऍक्शन मुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकाच दिवशी न करता केवळ टोकन देऊन सोयीच्या दिवशी लस घेण्याची मुभा द्यायला हवी होती अशी चर्चा यावेळी झाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *