राज्यात आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदांवर लवकरच भर्ती
अकोला (तेज समाचार डेस्क). राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. करोना संसर्ग पसरण्यात अकोला जिल्ह्याची परिस्थिती अधिक बिकट असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक आहे. त्यावर अत्याधुनिक साधनांचा वापर करून नियंत्रण मिळवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
– अकोला जिल्ह्याच्या परिस्थितिचा घेतला आढावा
अकोला जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत घेतला. यावेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत करोना परिस्थितीवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील मानकांपेक्षा अधिक बिकट परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. त्यामुळे अडचणी जाणून घेण्यासाठी आलो. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा दर जरा जास्त आहे. मृत्यूदर नियंत्रणात येत असला तरी राज्याचा तीन टक्के असून, अकोला जिल्ह्यात साडेपाच टक्क्यांवर आहे. रुग्ण दुप्पटीचे प्रमाण लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात साडेसतरा दिवसांत, तर अकोल्यात १३ दिवसांतच होत आहे, असं टोपे म्हणाले.
– शहरीभागात सर्वाधिक रुग्ण
शहरातून सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. करोना नियंत्रणासाठी जनजागृतीची गरज असून, त्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने सर्वेक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक केले पाहिजे. सोबतच त्यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत, असे टोपे म्हणाले.