श्री मनुदेवी मंदिर चैरिटेबल ट्रस्ट आडगाव च्या व्यवस्थापन व प्रशासन कार्यात सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचा बेकायदा हस्तक्षेप

Featured जळगाव
Share This:

श्री मनुदेवी मंदिर चैरिटेबल ट्रस्ट आडगाव च्या व्यवस्थापन व प्रशासन कार्यात सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचा बेकायदा हस्तक्षेप.

संभाव्य धोका निवारणार्थ संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांची यावल पोलीस स्टेशनला तक्रार.

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील सातपुडा वनातील तसेच संपूर्ण खानदेशातील सुप्रसिद्ध प्राचीन जागृक पुरातन श्री मनुदेवी मंदिर वन कक्ष 149 मौजे आडगाव या देवस्थानाच्या “श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्ट च्या व्यवस्थापन व प्रशासन कार्यात आता सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान जळगाव यांच्याकडून होत असलेल्या अनधिकृत हस्तक्षेप उपद्रव व संभाव्य धोका निवारणार्थ तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची लेखी तक्रार श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्टचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी फैजपुर भाग उपविभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार यावल,पोलीस निरीक्षक यावल यांच्याकडे केल्याने श्री मनुदेवी मंदिरावर कायदेशीर संबंध नसलेल्या”सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानने” आतापर्यंत केलेल्या कामकाजाकडे आता संपूर्ण खानदेशातील भाविकांचे भक्तगणांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान जळगाव तालुका जिल्हा जळगाव या नावाने दि.31/8/ 1991रोजी धर्मदाय आयुक्त जळगाव विभाग जळगाव कार्यालयात ‘ई’ 554 अन्वये नोंदणी करण्यात आली आहे त्या प्रकरणातील परिशिष्ट ‘1’ चे दस्तऐवज प्रत्यक्ष बघितले असता त्यातील स्तंभ ‘2’ मध्ये विश्वस्त संस्थेच्या नमूद असलेल्या मूळ पत्त्यात खाडाखोड करून म्हणजे जळगाव तालुका खोडून आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव असा बदल खाडाखोड करून केला आहे,खाडाखोड केल्यानंतर चे अक्षर बघितले असता त्या अक्षरात सुद्धा मोठी तफावत मूळ दस्तऐवजात प्रत्यक्ष दिसून येत आहे.
धार्मिक देवस्थानाचे व्यवस्थापन देखभाल-दुरुस्ती जीर्णोद्धार साठी नोंदणी करताना ‘A’ सेक्शन आवश्यक असते आणि आहे, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान जळगाव ची नोंदणी सन1991मध्ये ‘E’सेक्शन खाली नोंदवीली आहे.त्यानुसार सदर प्रतिष्ठानचा कोणत्याही देवस्थानाच्या व्यवस्थापनाशी काही एक संबंध नव्हता व नाही. म्हणून श्री मनुदेवी मंदिर आडगाव तालुका यावल या देवस्थानाचे सातपुडा निवासीनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानने व्यवस्थापन पाहाण्याचे सांगणे खोटे व चुकीचे ठरल्याने संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांचा “श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव” या नावाचा ट्रस्ट नोंदणीचा प्रस्ताव अर्ज दि.17जून2021रोजीच्या निकालात मा.धर्मदाय उपायुक्त जळगाव यांनी मंजूर केला व त्यानुसार त्यांना A.1367 या क्र. नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. यावरून सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान या ट्रस्टने जे कार्य केले ते कोणत्या नियमानुसार आणि कसे केले आहे? त्याचा निधि मनुदेवी मंदिराचे जिर्णोद्धाराच्या नावाने कसा गोळा केला?हे त्यांना व धर्मदाय आयुक्तयांनाच माहिती.
सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी प्रतिष्ठानने सन.1991 पासून श्री मनुदेवी मंदिर या देवस्थानाच्या नावाखाली जे काही कामकाज केले ते कामकाज मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम1950 नुसार केले आहे किंवा नाही?याबाबत अनेक कायदेशीर प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात असले तरी संबंधित शासकीय यंत्रणेने आतापर्यंत काय लेखापरीक्षण केले तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन काय खात्री केली? काय पडताळणी केली?चौकशी व कार्यवाही काय केली?तसेच सदर प्रतिष्ठान हे नोंदणी प्रमाणपत्रानुसार “जळगाव तालुका जिल्हा जळगाव चे” असतांना यावल तालुक्यातील तहसीलदार व पोलीस स्टेशनने यांनी सदर प्रतिष्ठानाला मनुदेवी मंदिर येथे अनधिकृत कृत्य करण्यास रोकथाम का केली नाही ? व आता निदर्शनास आल्याने आता काय ठोस निर्णय घेतात ? याबाबतची उत्सुकता आता संपूर्ण खानदेशातील श्री मनुदेवी भक्तगणांना,भाविकांना, नागरिकांना लागली आहे. यावल पोलीस स्टेशनला याबाबत दि.7जुलै2021रोजी श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट नोंदणी क्र.’A’1367 चे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की,श्री मनुदेवी मंदिराचे धार्मिक विधीसह संपूर्ण व्यवस्थापन व प्रशासन पाहण्याचे अधिकृत कायदेशीर अधिकार आता फक्त सदर श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्ट आडगाव यांना (म्हणजे संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांना व त्यांचे विश्वस्त मंडळाला)आहेत.अर्थात आतापर्यंत काम केलेल्या सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानला/ट्रस्टला सदर मनुदेवी मंदिर येथे कायदेशीर अधिकृत संबंध नव्हता नाही व होऊ शकत नाही याची जाणीव धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशा वरून झालेली आहे,तरी अनधिकृत प्रतिष्ठानचे काहीजण मंदिराचे दैनंदिन कामात हस्तक्षेप करीत मनात विक्षेप व क्षोभ निर्माण करणारी विधाने करून वाद निर्माण होईल असे प्रयत्न करतात व त्यांच्या सदर हस्तक्षेपामुळे त्यांच्यापासून मनुदेवी मंदिर परिसरात आडगाव मनुदेवी मार्गात गावात कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची व सदर नोंदणीकृत अधिकृत न्यासाचे पदाधिकाऱ्यांचे जिवास,शारीरिक सुरक्षतेबाबत धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तसेच त्यांच्या या अनधिकृत हस्तक्षेपामुळे धर्मादाय उपायुक्त जळगाव यांचे आदेशाचे उल्लंघन/अवमान होत आहे, वैयक्तिक अर्थात त्यांच्या सदर आदेशाचे अनुपालन करण्यास व अंमलबजावणी करण्यास संबंधितांकडून बाधा निर्माण होत आहे,या सर्वबाबी अत्यंत अनुचित व दूषित हेतूच्या असून गुन्हे प्रवृत्तीच्या आहेत वरील संबंधित यांचा अनधिकृत हस्तक्षेप थांबवण्यासाठी व माणुसकीने सहकार्य करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत स्नेह संदेश पाठविले आहेत तरी देखील त्यांनी हस्तक्षेप थांबविला नाही, म्हणून सदर तक्रार अर्ज आपल्या पोलीस स्टेशनकडे दाखल करणे भाग पडत आहे याप्रमाणे ते माणुसकी विसरून त्यांची अपप्रवृत्ती दाखवीत आहेत म्हणून सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान यांचे कडून व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्याकडून असा कोणताही हस्तक्षेप,उपद्रव होऊ नये व भाविकांनी श्रद्धेने गुप्तदानाने श्रीमनु मातेच्या सेवेत मंदिराच्या व दर्शनार्थीच्या सुविधार्थ समर्पित केलेल्या मंदिराच्या क्षेत्रफळ परिसरात पूर्वीपासून मौजूद असलेल्या मंदिराच्या व श्रींच्या उपयोगात असलेल्या कोणत्याही वस्तूंना जागेवरून,मंदिरातून व परिसरातून तेथून हलवू नये अशी त्यांना लेखी समज देऊन अविलंब प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी नम्र विनंती श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेली आहे तरी या प्रकरणात यावल पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *