केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. या केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.
कोरोनाच्या नियंत्रणात महाराष्ट्र सरकारकडून बेजबाबदारपणे काम करण्यात आलंय. हा प्रकार समजण्यापलिकडचा आहे. कोरोना लस पुरवठ्यावर सातत्याने लक्ष दिलं जातंय. राज्य सरकारांना याबाबत नियमितपणे माहिती देण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून नागरिकांमध्ये भीती पसरवणं मूर्खपणा आहे, अशी टीका हर्षवर्धन यांनी केली आहे.
गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचं ठरलं आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.
कोरोना नियंत्रणासाठी इतर राज्यांनी देखील आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करायला हवी. काही राज्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लसीकरण सुरु करण्याची मागणी केली जात आहे. याचा अर्थ या राज्यांमध्ये सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि वरिष्ठ नागरिकांचं लसीकरण झालंय असा अर्थ काढायला हवा. मात्र तसं झालेलं नाही, असं हर्षवर्धन म्हणाले.