
UGC ने जारी केले नवं शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक
UGC ने जारी केले नवं शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): करोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) निर्णय घेतला आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणार्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्पष्ट केलं आहे. पुढील वर्षी परीक्षा २६ मे ते २५ जूनच्या दरम्यान होणार आहे. १ ते ३० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना सुट्या असणार आहे. पुढील वर्षी विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२१ ला सुरू होणार आहे.
हे कॅलेंडर मार्गदर्शक तत्त्वे म्हणून जारी केलं गेली आहे. यूजीसीने स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या शिफारशींनुसार आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर हे वेळापत्रक तयार केलं गेलं आहे. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्भवलेली शैक्षणिक परिस्थिती मार्गी लावण्यासाठी काय करता येईल त्यासाठी या मार्गदर्शक सूचना आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांच्या उपस्थितीत हे कॅलेंडर आणि मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जाहीर करण्यात आली. विद्यापीठे परीक्षेच्या नवीन पद्धती अवलंबू शकतात. परीक्षेचा वेळ तीन तासांवरून कमी करत दोन तासांपर्यंत आणला जाऊ शकतो. सर्व टर्मिनल, एन्ड सेमिस्टर उपलब्ध साधनसामुग्रीनुसार ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेता येतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन व्हायलाच हवं. जुलै २०२० मध्ये विद्यापीठे या परीक्षा घेऊ शकतात.
लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, परीक्षा, ऑनलाईन अभ्यासक्रम याचा अभ्यास करण्यासाठी यूजीसीमार्फत दोन समित्यांची नेमणूक करण्यात आली होती. महाविद्यालये व विद्यापीठांचे पुढील शैक्षणिक वेळापत्रक कसे असू शकेल आणि या काळात परीक्षा घेण्यासंबंधी उपलब्ध पर्याय यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.