
अडावद येथील दोघे जिल्हा रुग्णालयात, आजपासुन ३ दिवस कडकडीत बंद
अडावद ता.चोपडा- अमळनेर येथील दि.२२ एप्रिल रोजी मृत झालेल्या व कोरोना पाॕझीटीव्ह असलेल्या ‘त्या’ इसमाच्या संपर्कात आलेल्या येथील बसस्थानक परिसरातील दोघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ४ जणांना होम काॕरंटाइन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर आज दि. २७ पासुन अडावद ३ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या ‘त्या’इसमाचा अडावद येथील शेतात गहू कापणीसाठी प्रवास झाल्याचे समोर आले आहे. यात दोन जणांचा प्रत्यक्ष संबध आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अडावद येथील ३ जण व लोणी (ता.चोपडा) येथील १ जण यांच्याही संपर्कात तो इसम आल्याने या चौघांना होम काॕरंटाईन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि. २६ रोजी अडावद पोलीस स्टेशनला सपोनि योगेश तांदळे, सरपंच भावना माळी,पंढरीनाथ माळी, माजी आरोग्य सभापती दिलीप पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ विष्णुप्रसाद दायमा,तलाठी महेंद्र पाटील, दिनकर देशमुख, वजाहतअली काझी, जहिर शेख, व्यापारी, व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्ते आदिंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ३ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मेडीकल, दवाखाने, दुध विक्रेते यांना वगळण्यात आले आहे.