वाहतूक व्यवस्था विस्खळित झाल्याने औषधांचा तुटवडा

Featured जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि). सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कारणाने अनेक गोष्टिंवर विपरित परिणाम झाला आहे. लॉकडाऊन मुळे जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम झाल्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांना त्यांना हवे असलेले औषध मिळत नसल्याने एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

– मेडिकल स्टोर्स मध्ये संपत आहे औषधांचा साठा
गेल्या आठवड्यात २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊन सुरू होऊन काही दिवस उलटल्यानंतर आता त्याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. मुखत्त्वे करून जळगाव जिल्ह्यात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांसह मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधी मिळत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठेतील बहुसंख्य मेडिकल्समध्ये असलेला औषधींचा साठा आता संपला आहे. नव्याने मागणी नोंदवूनही औषधींचा पुरवठा कंपन्यांकडून होत नाही. लॉकडाऊनमुळे औषधी कंपन्यांच्या उत्पादनावरदेखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कंपन्यांमध्ये लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला साठाही वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने स्थानिक पातळीपर्यंत पुरवण्यात अडचणी येत आहेत.

– ऑपरेशन झालेल्या रुग्णांचे होत आहे हाल
अनेक रुग्ण मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील नामांकित दवाखान्यात करतात. तेथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली औषधीदेखील त्याठिकाणीच मिळते. मात्र, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने औषधी घेण्यास जात येत नाही. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. वेळेवर औषधी मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नामांकित मेडिकल्समध्येदेखील आवश्यक ती औषधी तसेच इतर सामुग्री मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर काही लोकांनी खबरदारी म्हणून आवश्यक ती औषधी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेऊन ठेवल्याने बऱ्याच औषधी मेडिकल्समधून संपल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *