परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.
अनिल परब यांनी या आधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून तब्बल 1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवून दिले होते. लॉकडाऊनचा एसटीच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला होता. अत्यंत अल्प उत्पन्न मिळत असल्याने त्यातून दैनंदिन खर्च भागवणं शक्य नव्हतं. 98 हजार कामगारांचे पगारही रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एसटीला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.
एसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळाने शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे.