
मालेगाव येथील २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू – अहवाल प्रलंबित
मालेगाव (तेज समाचार डेस्क) : येथील सामान्य रूग्णालयात करोना विषाणू आजाराची लक्षणे असणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे घश्याचे श्राव तपासणीसाठी पाठविण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने सदर रुग्ण करोना बाधित आहे किंवा नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
येथील सामान्य रूग्णालयात काल गुरुवार दि.१६ रोजी शहरातील एक ५५ वर्षीय वृद्ध महिला तर ८१ वर्षीय वृद्ध पुरुष यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र काल गुरुवार दि.१६ रोजी रात्री यातील महिला तर आज दि.१७ रोजी सकाळी ६ वा. वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाला. या दोघा रुग्णांचे अहवाल आल्यानंतरच ते करोना बाधित आहेत किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. या आधीही मालेगाव व नांदगाव या तालुक्यातील दोन महिलांचा रविवार दि.१२ रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. यापैकी नांदगाव येथील मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून मालेगाव येथील मृत महिलेचा अहवाल प्रलंबित आहे. मालेगाव शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४७ झाली असून ३ मृत रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.