महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, 35 कोटींच्या खंडणीची मागणी
मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता, दिग्दर्शक तसंच निर्माते महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज मोबाईलवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकीचे मेसेज आल्याची माहिती आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महेश मांजरेकर यांना व्हॉटसॅपवरून हे धमकीचे मेसेज आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या मेसेजेसद्वारे 35 कोटीं रूपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकीचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. अबू सालेम टोळीकडून महेश मांजरेकर यांना धमकी मिळाल्याची माहिती आहे. रविवारी देखील त्यांना धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरु आहे. याशिवाय एका व्यक्तीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.