
सुंदर नसल्याने या नायिकेला रिप्लेस केले जात असे
मुंबई (तेज समाचार डेस्क): हिंदी सिनेमातील नायिका ही सुंदर दिसणे ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली अट असते. सुंदर असलेली नायिका मग सिनेमात मेकअप विना सावळ्या रंगाच्या किंवा कुरुप दिसणाऱ्या मुलीची भूमिका करते आणि ती वाखाणलीही जाते. मात्र वास्तव जीवनात अशी एखादी मुलगी असेल तर तिला सिनेमात काम मिळणे प्रचंड कठिण असते. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे बॉलिवूडमध्ये बाहेरून येणाऱ्या कलाकारांप्रती भेदभाव करण्याच्या अनेक घटनाही समोर आलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या भेदभावाबाबत प्रचंड चर्चाही झाली आहे. अशाच एका संघर्षरत नायिकेला केवळ ती सुंदर नसल्यामुळे सिनेमातून काढून टाकण्याची घटनाही घडली होती. ही घटना त्या नायिकेने स्वतःच सांगितली आहे.
भेदभाव झाल्याची ही घटना सांगितली आहे प्रख्यात अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu). तापसीने सांगितले, ‘मी जेव्हा सिनेमात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा खूप वाईट अनुभवांचा सामना मला करावा लागला. मी बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती तेव्हा मी बॉलिवूडच्या नायिकांप्रमाणे सुंदर नसल्याने मला सिनेमातून काढून टाकण्यात आले होते. हे तर काहीच नाही, एका सिनेमाचे डबिंग करीत असताना हीरोला डायलॉग बोलण्याची माझी पद्धत न आवडल्याने डबिंग आर्टिस्टकडून माझे डायलॉग डब करून घेण्यात आल्याची माहितीही तापसीने दिली. काही हीरो तर माझे सिनेमातील इंट्रोडक्शन सीन्स बदलण्यास सांगत असत. त्यांना माझा इंट्रोडक्शन सीन त्यांच्या इंट्रोडक्शन सीनपेक्षा जास्त चर्चित होईल ही भीती त्यांना वाटत असे. या गोष्टी तर माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या होत्या. माझ्या माघारी अजून अशा किती गोष्टी होत असतील ते सांगणे कठिण असल्याचेही तापसीने म्हटले.
या अनुभवानंतर मी फक्त सिलेक्टेड आणि ज्या सिनेमात मला कंफर्टेबल वाटेल असेच सिनेमे करण्याचा मी निर्णय घेतला. त्यामुळे माझ्याकडे भरपूर सिनेमे नसले तरी जे सिनेमे आहेत ते चांगले आणि वेगळे सिनेमे आहेत असेही तापसीने म्हटले. तापसी पन्नूने नुकतेच ‘रश्मि रॉकेट’ या धावणाऱ्या मुलीच्या जीवनावरील सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले असून आता ती क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक ‘शाबाश मिथु’च्या तयारीत बिझी आहे. यासाठी सध्या ती क्रिकेट खेळण्याची प्रॅक्टिस करीत आहे. यासाठी ती क्रिकेट कोच नूशीन अल खदीरकडून क्रिकेटचे ट्रेनिंग घेत आहे. राहुल ढोलकिया (Rahul Dholakia) या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहे.