
चित्रपटातील महिलांवरील गीत, पटकथा लिहिण्यात बदल झाला पाहिजे -सोनम कपूर
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच महिलांच्या अधिकाराबाबत बोलत असते. महिलांना समान संधी मिळावी, त्यांचा नेहमी आदर केला जावा असे तिला वाटत असते आणि यासाठी ती आपले मतही व्यक्त करीत असते. इन्स्टाग्राम वर सोनमने #WomenInFilm मालिका सुरु करून चित्रपट सृष्टीतील महिलांच्या योगदानाबाबत माहिती देण्याचे काम केले आहे. आता एका मुलाखतीत चित्रपटातील महिलांबाबत बोलताना सोनम कपूरने म्हटले आहे की, चित्रपटातील गीते लिहिताना आणि पटकथा लिहिताना महिलांचा आदर केला पाहिजे. यात बदल झाला पाहिजे.
मुलाखतीत सेक्सीजमवर बोलताना सोनम म्हणते, महिलांनी आता पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चित्रपटसृ्ष्टीत अशी धारणा आहे की, अभिनेत्रींना ठराविक कपडेच दिले पाहिजेत आणि त्यांनी ठराविक पद्धतीनेच अॅक्टिंग केले पाहिजे. यात आता बदल घडवणे आवश्यक आहे. एखाद्या अभिनेत्रीला मोठ्या नायकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली की ती तिची मोठी अचिव्हमेंट समजली जाते. त्यानंतर तिला कसे कपडे घालायचे आणि कसे बोलायचे हे सांगितले जाते. हे चुकीचे आहे. यात आता लवकर बदल घडून येईल अशी आशाही सोनमने व्यक्त केली आहे.