माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज

Featured जळगाव
Share This:

जळगाव – भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे. चांगली भाषा बोलणे आणि चांगले लेखन करणे ज्याला येईल त्याला रेडिओ क्षेत्रात करिअरच्या वाटा खुल्या होतील. रेडिओ माहिती प्रसारणाचे उत्तम माध्यम आहे. ग्रामीण विकासात रेडिओने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन भाषा प्रशाळा विभागातील मराठी विभागाचे डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि.१४ व १५ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिनानिमित्त “रेडीओ कार्यक्रम निर्मिती,वृत्तसंपादन आणि कौशल्य” याविषयावर द्विदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. समारोपावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळाचे संचालक डॉ.अनिल चिकाटे होते. मंचावर औरंगाबाद येथील माय एफ.एम. केंद्राचे आर.जे.अभय, विभागप्रमुख डॉ. सुधीर भटकर, कार्यशाळा समन्वयक डॉ. विनोद निताळे उपस्थित होते. कार्यशाळेचा आढावा घेताना डॉ. सुधीर भटकर यांनी, कार्यशाळेतील तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल आणि ते भविष्यात  प्रगती करतील अशी अशा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. चिकाटे यांनी, विद्यार्थ्यांना कार्यशाळा कौशल्यनिर्मिती आणि रोजगारासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.गोपी सोरडे, प्रा.विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस शिंदे याने तर आभार गुलाब पाटील यांनी मानले.

दिवसभरातील मार्गदर्शन

 कार्यशाळेच्या दुस-या दिवशी पहिल्या सत्रात जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे यांनी “रेडिओ कार्यक्रम निर्मिती : स्वरूप व प्रणाली ” याविषयी मार्गदर्शन केले. निर्मितीपूर्व, निर्मिती करताना आणि निर्मिती झाल्यावर करायची कार्यवाही यातील सविस्तर बाबी त्यांनी सांगितल्या. बातमी, शब्द, संगीत या तीन गोष्टींवर आकाशवाणीचे कार्यक्रम असतात. शिक्षण देणे, मनोरंजन करणे, माहिती देणे हे आकाशवाणीचे उद्दिष्ट असते. महिला, युवा, शेतकरी, जेष्ठ नागरिक अशा विविध घटकांना विविध विषयी मार्गदर्शन करून लोक जागृतीचे काम आकाशवाणी करते. कार्यक्रम निर्मितीत पुरेसा मजकूर गोळा करायला सकस वाचन, सामाजिक अभ्यास देखील तितकाच महत्वाचा असतो, असेही बोबडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचालन वसंती तडवी यांनी तर परिचय विनोद शेलोरे यांनी करून दिला.

दुस-या सत्रात औरंगाबाद येथील माय एफ एम केंद्राचे आर.जे.अभय यांनी विद्यार्थ्यांना “रेडिओ जॉकी : स्वरूप व तंत्र” या विषयी मार्गदर्शन केले. श्रोत्यांचा मूड बघूनच आर जे ला बोलावे लागते. विविध क्षेत्रातील व्यक्तींचे, घटनांचे विविध किस्से तुम्हाला माहिती हवेत. तसेच गाणी वाजवताना प्रहरानुसार आणि वेळ पाहून गाणी वाजवावी लागतात. चांगल दिसण, बोलण, आणि उत्साह आर जे कडे असायला हवा. एखादी माहिती सांगताना श्रोत्यांना समजेल अशा भाषेत स्वारस्य निर्माण करीत सांगितले पाहिजे, असेही आर जे अभय याने विद्यार्थ्यांना समजून सांगितले.  सूत्रसंचालन मयूर पाटील  हिने तर परिचय चिन्मय जगताप यांनी करून दिला. कार्यशाळेचा दोन दिवसात जळगाव व धुळे येथील ८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, सुनील रडे, विष्णू कोळी यांचेसह विभागातील विद्यार्थी मयूर पाटील, वैशाली पाटील, मनिष मराठे, धनश्री राठोड, गुलाब पाटील, तेजस शिंदे, गणेश साळुंखे, वसंती तडवी, मन्जीला पाडवी, सुनील भोई, सुमित बोदडे, विनोद शेलोरे, भावना पचोरीया, चिन्मय जगताप, आदींनी परिश्रम घेतले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *