कोरोनामुळे बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी सण साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय

Featured महाराष्ट्र
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीत दिवाळीचा सण साजरा करतात. पण यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे म्हटले आहे. करोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करु, असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला व हितचिंतकांना केले. कोरोनामुळे यावर्षी दिवाळीचा कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करु. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवू, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबियांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *