
देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ
देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातली कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. काल एकाच दिवशी देशात 8 हजार 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख चढत्या क्रमाने पाहायला मिळतो आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवड्याभरा अगोदर भारत 9 व्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत देशात 204 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 हजार 598 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब देशात 95 हजार 523 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशात सध्या 97 हजार 581 अॅक्टीव्ह केस आहेत ज्यांच्यावर देशातल्या विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.