चळवळीला संशोधन आणि प्रशिक्षणाची जोड हवी -डॉ. विनय सहस्रबुद्धे

Featured जळगाव महाराष्ट्र
Share This:

जळगाव – कोणतीही चळवळ असो, विशेषता: निसर्गसंवर्धन चळवळ ही संशोधनाच्या आणि ज्ञानाच्या पायावर उभारली गेली पाहिजे, या अनुषंगाने जैवविविधता पक्षी शास्त्र आणि वन्यजीव संवर्धन हे अभ्यासक्रम मैलाचा दगड ठरतील, असे असे प्रतिपादन राज्यसभेतील खासदार आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी येथे केले, ते पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभात बोलत होते.

या अभ्यासक्रमांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि विस्तार विभागाने मान्यता दिली आहे. या अभिनव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. पी. पी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. नितीन काकोडकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य श्री. किशोर रिठे, सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत अमळकर उपस्थित होते.

श्री. सहस्रबुद्धे यांनी पुढे सांगितले की, समाजामध्ये पर्यावरण साक्षरता आणि पर्यावरण सक्रियता निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन संस्थेचे कार्य अतिशय मोलाचे ठरते, वसुंधरा महोत्सव, पर्यावरण साहित्य संमेलन, आणि पक्षीमित्र संमेलनांचे आयोजना मध्ये पर्यावरण शाळेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार जनप्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून निसर्ग संवर्धन चळवळीवर अत्यंत दूरगामी परिणाम करणारा आहे. सातपुडा बचाव अभियान आणि व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. याप्रसंगी त्यांनी कवित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचेही कौतुक केले, कारण या विषयावर औपचारिक असा अभ्यासक्रम अद्याप विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोणत्याही विद्यापीठाने सुरू केलेला नाही किंवा या अनुषंगाने पुढाकारही घेतलेला नाही.

याप्रसंगी बोलताना प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री नितीन काकोडकर यांनी सांगितले की, पश्चिम सातपुड्यातील वनक्षेत्र एका अर्थाने उपेक्षितच राहिलेले आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात वाघांचा अधिवास असूनही, वन्यजीवांच्या संचार मार्ग विकासनाच्या कार्याला विशेष गती येऊ शकली नाही, हे वास्तव त्यांनी मान्य केले, परंतु आता वनविभागाने या संपूर्ण क्षेत्राच्या विकासासाठी लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असून, लवकरच मेळघाट, मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र, यावल , आनेर येथील वनक्षेत्राची जोडणी करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे ज्ञानगंगा आणि गौताळा ही अभयारण्ये जोडण्यासाठीही प्रयत्न केले जातील. विद्यापीठ आणि पर्यावरण शाळेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

किशोर रिठे यांनी सांगितले की गेल्या दशकामध्ये जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या व्यापक कार्याचे दृश्य स्वरूप आता दिसू लागले असून, मुक्ताई भवानी आणि संवर्धन क्षेत्राची निर्मिती, संचार मार्गाच्या प्रस्तावाला मिळालेली गती, आणि लांडोरीला जैवविविधता वारसा स्थळाचा मिळालेला दर्जा ही या कार्याची फलश्रुती आहे.

याप्रसंगी भरत अमळकर यांनीही जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या वन संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या विविध कार्यक्रम, प्रकल्प आणि उपक्रमांची माहिती करून, विशेषत: नंदुरबार येथे कार्यान्वित करण्यात आलेली आदिवासी विकास प्रबोधिनी, एकलव्य प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठातील जैवविविधता जोपासण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला, त्याचप्रमाणे आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाप्रमाणे डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पर्यावरण शाळेच्या प्रयत्नांना विद्यापीठातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासनही दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेचे संचालक राजेन्द्र नन्नवरे यांनी केले, त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन करून जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्याची माहिती करून दिली. आभार अर्चना उजगरे यांनी मानले, कार्यक्रमासाठी वन विभागातील अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी ,सिनेट सदस्य आणि पर्यावरण चळवळीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ADMISSION OPEN

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *