वकील खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांशी संपर्क

Featured पुणे
Share This:

वकील खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांशी संपर्क

पुणे (तेज समाचार डेस्क): शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून मृतदेह जाळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने पिंपरी-चिंचवडच्या सत्ताधारी माजी महापौरांशी संपर्क साधल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या गाडीवर विद्यमान आमदारांचा फोटो वापरल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून दोन्ही नेत्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी याप्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, तपासात ही माहिती पुढे आल्याने पिंपरी चिंचवड शहरतील राजकीय गोटात खळबळ आहे. कपिल विलास फलके (वय 34, रा. चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, रा. आष्टी, जि. बीड), रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, रा. मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे (वय 33, रा. धनकवडी) असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे.

जमिनीच्या वादातून अ‍ॅड. उमेश मोरे यांचे 1 ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल फलके मूळचा पिंपरी-चिंचवडमधील चिखलीचा रहिवाशी आहे. त्याने खूनात वापरलेल्या गाडीवर पिंपरी-चिंचवडमधील एका विद्यमान आमदाराचा फोटो चिटकविल्याचे दिसून आले होते. त्याशिवाय आरोपी फलके याने पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर यांच्याशीही संपर्क केला होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांची चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, यासंदर्भात आम्ही कोणत्याही नेत्याला बोलाविले नसल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली आहे.
अॅड. मोरे खून प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू असताना पोलीस ठाण्याबाहेर काही राजकीय मंडळी ये-जा करीत असल्याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांची पुणे पोलिसांनी विचारपूस केल्याची चर्चा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रंगली होती.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *