व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून उद्रेकी मनस्थितीत आले आहेत. तरीही लॉकडाऊन वाढवला जात असेल; तर मात्र भा.ज.पा. जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल – विजय चौधरी

Featured नंदुरबार
Share This:

व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून उद्रेकी मनस्थितीत आले आहेत. तरीही लॉकडाऊन वाढवला जात असेल; तर मात्र भा.ज.पा. जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल – विजय चौधरी

नंदुरबार – ( वैभव करवंदकर ): सलग दळणवळणबंदीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून उद्रेकी मनस्थितीत आले आहेत. तरीही लॉकडाऊन वाढवला जात असेल; तर मात्र भारतीय जनता पार्टी जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल; असा ईषारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिला.
भारतीय जनता पार्टी आणि जिल्ह्यातील सर्वात छोटे दुकानदार व व्यवसायिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना दिलेल्या निवेदनात विजय भाऊ चौधरी यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारली असून रुग्ण संख्या चांगलीच घटलेली आहे. एप्रिलच्या प्रारंभापासून जे रोज सरासरी १२०० रुग्ण आढळू लागले होते आज ते सरासरी २०० वर प्रमाण आले आहे. आधीपेक्षा बरे होऊन परतणार्‍या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. तसेच हजारोच्या संख्येने बेड रिकामे पडल्याचे फोटो रोज छापून येत आहेत. एकूणच आपल्या जिल्ह्यातील कोरोना प्रसार आटोक्यात आल्याचे दर्शवणारे हे चित्र आहे. तथापि आधी जिल्हा प्रशासनाने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाऊन वाढवत नेला. त्यामुळे सलग दीड महिन्यांपासून म्हणजे १ एप्रिल पासून आता १५ मे पर्यंतच्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. असेही वर्षभर आधीपासून बाजारपेठेतील प्रत्येकाची उलाढाल थांबलेली आहे. अशात लॉकडाऊन वाढवणार असल्याच्या वृत्ताने सगळे हवालदील झाले असून उद्रेकी मनस्थितीत आले आहेत, असे नमूद करून निवेदनात चौधरी यांनी पुढे म्हटले आहे की, महिनोन महिने उत्पन्न थांबले असल्याने प्रत्येक व्यावसायिक तसेच गरीब श्रमिक वर्ग मनाने उध्वस्त झाला आहे. जसे की, विविध वस्तू साहित्य आणि पदार्थ हातलॉरीवर विकणारे लहान विक्रेेते, वेगवेगळ्या गोष्टींची विक्री करणारे छोटे छोटे दुकानदार, शिलाई काम करणारे, सलून चालवणारे, लोहारकाम, सुतारकाम करणारे, सौंदर्य प्रसाधने आणि तत्सम गोष्टींची विक्री करणारे छोटे व्यावसायिक व कष्टकरी श्रमिक लोक अक्षरश: उपासमार भोगत आहेत. त्याच प्रमाणे सर्व क्षेत्रांशी संबंधीत विक्री करणार्‍या मोठ्या दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना, विक्रेत्यांना तर दरमहिन्याचे वीज बील, जागेचे भाडे, त्यांच्यावर विसंबलेल्या माणसांचा पगार, बँक-पतपेढ्यांचे हप्ते, होमलोनचे हप्ते कुठून अदा करायचे हा प्रश्‍न उभा राहिला आहे. व्यवसाय बंद असला तरी दरमहिन्याचे खर्च कोणालाही माफ झालेले नाहित.
परिणामी लॉकडाऊन हा कोरोना महामारीवरील उपाय वाटण्या ऐवजी व्यवसायीकांना संपवणारा व उपासमार घडवणारा घोर अन्याय वाटू लागला आहे. म्हणून १५ मे २०२१ नंतर कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊन वाढवला जाऊ नये तसेच १५ मे पासून सर्व व्यावसायिकांना सूट देऊन व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी द्यावी, अथवा त्यांना दिवसातील सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांच्या वतीने नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी आपणास या निवेदनाद्वारे करीत आहे.
व्यावसायिक तसेच नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत झालेला असतांनाही लॉकडाऊन वाढवला जात असेल तर मात्र भारतीय जनता पार्टी जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल. तत्कालीन स्थिती पाहून आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, हेही आपणास विदित करतो, असे शेवटी विजय भाऊ चौधरी यांनी म्हटले आहे.
या निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, जिल्‍हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *