सडक-2 ला बसला नेपोटिझमचा फटका

Featured इतर
Share This:

सडक-2 ला बसला नेपोटिझमचा फटका

 

मुंबई (तेज समाचार डेस्क) : महेश भट्ट यांनी 21 वर्षांपूर्वी सडक चित्रपट तयार केला होता. संजय दत्त आणि पूजा भट्ट अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. पहिला सडक पूजा या मुलीसाठी महेश भट्ट यांनी तयार केला. आणि आता 21 वर्षानंतर आपल्या दुस-या आलिया या मुलीसाठी सडक-2 ची निर्मिती केली. चित्रपटात संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य कपूरच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची योजना त्यांनी आखली होती परंतु कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. मात्र चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. आणि याला निमित्त आहे युवा अभिनेता सुशांत सिंह याचा मृत्यू. त्याने आत्महत्या केल्यानंतर बॉलिव़ुडमध्ये नेपोटिझमवर चर्चा सुरु झाली.

बॉलीवुडमध्ये फक्त जवळच्या लोकांनाच संधी दिली जाते आणि बाहेरच्यांना काम दिले जात नाही अशी चर्चा संपूर्ण भारतात सुरु झाली. यात आलिया भट्ट आणि करण जोहर यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. करण जोहरने तर ट्रोलर्सना कंटाळून आपला सोशल मीडिया अकाउंटच काही दिवसांसाठी बंद केला. आलिया केवळ महेश भट्टची मुलगी असल्यानेच तिला काम मिळते अशी चर्चा सुरु झाली. काही दिवसांपूर्वी जेव्हा सडक-2 चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केले होते. त्यानंतर पुन्हा दुसरे पोस्टर रिलीज करीत प्रदर्शनाची तारीखही त्यात सांगण्यात आली. मात्र प्रेक्षकांनी ट्रोल करीत चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरु केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद किती प्रचंड होता त्याचा प्रत्यय सडक-2 च्या ट्रेलर प्रदर्शित केला तेव्हा आला.

12 ऑगस्ट रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. आलियानेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रेलर रिलीज केला पण प्रेक्षकांची नाराजी पाहून तिने कमेंट ऑप्शन बंद करून टाकले होते. पण प्रेक्षकांनी यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या ट्रेलरवर आपला सगळा राग काढला आहे. त्यामुळे 24 तासातच सडक 2 चा ट्रेलरला 70 लाखांच्या आसपास डिसलाईक मिळाले. सगळ्यात जास्त डिसलाईन मिळवणा-या यूट्यूबवरील व्हीडियोत हा चित्रपट पहिल्या पाचात आला आहे. विशेष म्हणजे चित्रपट श्रेणीतील हा जगातील पहिलाच चित्रपट आहे ज्याला इतके डिसलाईक मिळाले आहेत. केवळ आलिया भट्टच नव्हे तर संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर फिल्मी घराण्यातीलच असल्याने प्रेक्षकांचा चित्रपटावर प्रचंड राग आहे. आणि सोशल मीडियावर जर प्रेक्षकांच्या कमेंट पाहिल्या तर त्याचा अंदाज येतोच. एवढेच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणीही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सुशांतला न्याय मिळवून द्यायचा असेल तर अशा चित्रपटांवर बंदी घालावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. चित्रपटाचे मिम्सही तयार करण्यात आले असून तेसुद्धा प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने महेश भट्ट यांना किंवा ओटीटी प्लॅटफार्म कंपनीला फरक पडणार नाही. कारण महेश भट्टने ओटीटी कंपनीकडून पैसे घेतले आहेत तर ओटीटी कंपनी पुढील अनेक वर्ष हा चित्रपट दाखवू शकणार असल्याने त्यांचे पैसे वसूल होणार आहेत. देशभरातील प्रेक्षकांची नाराजी पाहाता हा चित्रपट जर मोठ्या पडद्यावर येणार असता तर मात्र त्याचे काही खरे नव्हते हे नक्की.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *