थाळनेर म्हणजे थळ+नीर या शब्दांची संधी

Featured महाराष्ट्र
Share This:

थाळनेर म्हणजे थळ+नीर या शब्दांची संधी. थळ म्हणजे जमीन आणि नीर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर. धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर तापी नदीकाठी थाळनेर गावात हा किल्ला असून अनेक राजवटी व त्यांचा वैभवशाली काळ पाहिलेला हा किल्ला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. थाळनेर हे एकेकाळी खानदेशची राजधानी व सुरत- बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होते. लता मंगेशकर यांचे आजोळ थाळनेरला होते. तापी नदी थाळनेर गावाजवळ नालेच्या U आकाराचे वळण घेते. तेथेच एका लहानश्या ३०० फुट उंच टेकडीवर साधारण त्रिकोणी आकाराचा थाळनेरचा किल्ला ३ एकरवर वसलेला आहे.

एक बाजूने तापी नदी असल्याने ती बाजू संरक्षित झाली होती तर दुसऱ्या बाजुला तटबंदी आणि बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला होता. किल्ल्यामध्ये येण्याच्या मार्गावरील दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तापी नदीचे पाणी किल्ल्याला धडकून पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्याने या बाजूची संपुर्ण तटबंदी ढासळली आहे. आज केवळ किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व ३ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज ढासळलेले आहेत. किल्ल्यामध्ये खुरटी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने जपूनच फिरावे लागते. थाळनेर गावातील नागरिकांनी किल्ल्यातील मोठमोठे दगड, माती आणि विटा हे बांधकामासाठी नेऊन हा किल्ला अक्षरशः पोखरून काढला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

THANKFUL FOR VISHAL DEVKAR

किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत.एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर पाताळेश्वर मंदिराच्या बाजुला शेंदूर फासलेली हनुमान मुर्ती असुन शेजारील देवडीत एक झिजलेले शिल्प ठेवलेले आहे. गडावर पाण्याचा आजही साठा असणाऱ्या दोन विहिरी असुन एका विहीरच कठडा पुर्णपणे ढासळलेला आहे. याशिवाय गडावर पाण्याचे दोन हौद असुन संपुर्ण गडावर खापरी नळातुन पाणी फिरवल्याचे अवशेष दिसून येतात. गड फिरताना झाडीत दोन ठिकाणी जमिनीत साठवणीचे रांजण पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्याच्या पायथ्याशी स्थळेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आह़े. मंदिराच्या समोर अखंड पाषाणात कोरलेला एक नंदी बसविलेला आह़े. काळ्या पाषाण दगडांनी हे मंदिर उभारले असुन आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. मंदिरात शिवाची पिंड आह़े.

किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्या सारखी आहेत. गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक जमादार वाडा म्हणतात. या वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दार खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते गढी दाखवतात पण त्यांचा इतिहास त्यांना ठाऊक नाही. गढीच्या मुख्य दरवाजावर रामसिंग व गुमानसिंग ही नावे लिहीलेली दिसतात. याशिवाय थाळनेरवर राज्य करणाऱ्या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या ११ फूट x ११ फूट आकाराच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे १) मलिकराजा (१३९६) २) मलिक नसिर (१४३७) ३) मिरान अदीलशहा(१४४१) ४)मिरान मुबारकखान(१४५७). थाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकखान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. तो काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात आला असताना त्याला एक कुत्रा सशाच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीत शौर्याची भूमी असली पाहीजे. या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान फिरोजशहा तुघलक याची सत्ता होती. या सुलतानाकडून मलिकखान याने एका छोट्या पण महत्त्वाच्या कामगिरीबद्दल थाळनेर व करवंद हे परगणे इ.स.१३७० मध्ये जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली.

THANKFUL FOR PRADEEP LAHOTI

थाळनेर येथील उत्खननात सहाव्या शतकात होऊन गेलेल्या कुंभकर्ण घराण्यातील भानुशेष राजाचा ताम्रपट आढळला असुन या ताम्रपटा नुसार थाळनेरचे त्या काळातील नाव स्थलकनगर होते. सहाव्या व सातव्या शतकात कुंभकर्ण नावाचे राजघराणे येथे राज्य करत होते. ते राजे मांडलिक राजे होते व त्या घराण्यात पाच राजे होऊन गेल्याची माहिती नव्याने समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पुर्वी खानदेशची राजधानी होते. इ.स. ११२८ मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी किंवा अहीर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता. देवगिरीचा राजा बाजीराव ह्याचा मुलगा दौलतराव खानदेशची पहाणी करण्यासाठी आला असता त्याला थाळनेरची भरभराट झाल्याची आढळले. त्यामुळे खुश होऊन त्याने जिवाजी आणि गोवाजीच्या कुटुंबाला थाळनेरचा प्रमुख बनविले. इ.स. १३७० मध्ये फिरोजशहा तुघलक याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि मलिकराजा फारुकी याला दक्षिण गुजरातची सुभेदारी बहाल केली. मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनविली. इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करून थाळनेर येथे किल्ला बांधला. पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानाने मलिकवर हल्ला करुन त्याचा प्रदेश हिसकावून घेतला. मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहीला. इ.स.१३९९ मध्ये मलिक मेल्यावर त्याने आपल्या दुसरा मुलगा मलिक इफ्तीकार याला थाळनेरचा ताबा दिला. त्यामुळे चिडलेला पहिला मुलगा नासिर खान याने इ.स.१४१७ मध्ये माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतला.(१४१७). इ.स.१४९८ मध्ये गुजरातचा सुलतान मो.बेगडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालुट केली.

१५११ मध्ये मो.बेगडाने अर्धा खानदेश तसेच थाळनेर आपला वजिर मलिक हसनुद्दीन याला बहाल केला. पण पुढच्याच वर्षी त्याचा खुन झाला आणि थाळनेर पुन्हा खानदेश मध्ये सामील करण्यात आले. गुजरातचा सुलतान चंगेज खानने इ.स. १५६६ मध्ये खानदेशचा राजा मिरान मुहम्मद खान याचा पराभव केला. इ.स.१६६० मध्ये मोगल सम्राट अकबराने खानदेशचा फारुकी घराण्याचा शेवटचा राजा बहादूरशहा फारुकी याचा पराभव केला आणि थाळनेरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यावेळी सुरत-बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता. इ.स.१६९७ मध्ये सरदार नेमाजी शिंदे यांनी 8 हजार घोडेस्वारनिशी खानदेशातील नंदुरबार व थाळनेर ही शहरे लुटली़ त्या वेळी मुस्लीम सरदार हुसेन अलीखान यांचा पराभव करून त्याने थाळनेर येथून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट केली होती़ या घटनेवरून थाळनेर हे गाव वैभवसंपन्न असल्याचे लक्षात येत़े. १७५० मध्ये थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे आल्यावर त्यांनी तो होळकरांना सरंजाम म्हणून दिला. १८०० मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात मराठ्यांचे २५० लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले यात त्यांचे सात अधिकारीही कामी आले.

किरण शांताराम पाटील

9422767350

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *