
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात- वर्षा गायकवाड
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षांना यावर्षी लेटमार्क लागणार आहे. या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांना दहावी-बारावी परीक्षा संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, “दरवर्षी दहावी- बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात. परंतु कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप शाळा सुरु करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे यासंदर्भात शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. तसेच राज्य शिक्षण मंडळाशी देखील याबाबत चर्चा सुरु आहे”.
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील एक प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळापुढे ठेवला होता. परंतु दहावी-बारावीचे विषय जास्त असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बऱ्याच अडचणी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.