
देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे. या काळात आपत्कालीन प्रसंगात काम करणं सोपं व्हावं यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणं तात्पुरत्या स्वरुपात बंद केलं आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळं वाचू शकेल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि अॅम्ब्युलेंस आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत वाहनांना सेवा पुरवण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल.