
सुशांतची मॅनेजर दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही खूनच : नारायण राणे यांचा आरोप
मुंबई (तेज समाचार डेस्क) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
“सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही,” असे नारायण राणे म्हणाले. “बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण इथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेलं नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत,” असेही राणेंनी यावेळी सांगितले.
“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले. रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असे नारायण राणेंनी सांगितले.