
महाज्योती बचाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्रीना निवेदन
महाज्योती बचाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्रीना निवेदन
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : महाज्योती या व्ही.जे.एन.टी., ओ.बी.सी., एस.बी.सी. विद्यार्थ्यांच्या हितार्थ स्थापन केलेल्या संस्थेला भरीव निधी देवून संस्थेत अशासकीय सदस्यपदी भटके विमुक्तातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी महाज्योती बचाव कृती समिती नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदना म्हटले आहे की, राज्यात भटके-विमुक्तांची अंदाजे १ कोटी ३० लाख जनसंख्या असून त्यांच्या विकासासाठी ठोस उपाय न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राज्यभर ‘ढोल बजाओ’ आंदोलनाद्वारे निवेदन देण्यात आले. महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरु करावेत. त्यास निधी वाढवून २५०० कोटी, शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरीता १२०० कोटी, वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठी १६० कोटी, वसतंराव नाईक महामंडळाकरीता ८० कोटी सत्वर जाहीर करण्यात यावा, बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजनेसह प्रशिक्षण, फेलोशिप सुरु करावे, ओ.बी.सी. समाजाची जातीनिहाय जनगणना सुरु करावी, धनगर समाजाप्रमाणे संपूर्ण प्रवर्गाला सवलती जाहीर कराव्यात, संपूर्ण प्रवर्गाला क्रिमिलेअरच्या अटीतून वगळावे, यासह विविध मागण्यांची पूर्तता करुन मागासवर्गीयांना सामाजिक न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शासनाने मागण्यांवर अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रामकृष्ण मोरे (भोई), रविंद्र गोसावी, राजेंद्र पाठक (ओतारी), राकेश तमायचेकर (कंजरभाट), सुरेश जोशी-गोंधळी, वरुण भारती (गोसावी) आदींच्या सह्या आहेत.