प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती

Featured देश
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क) : भारताने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली पोसी़डॉन P-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचबरोबर शस्त्रसज्ज प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही योजना आहे. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल बरोबरच्या शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराला गती दिली आहे. भारताकडून सध्या मोठया प्रमाणावर P-8I विमानांचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नौदलाच्या ताफ्यात आठ P-8I विमाने आहेत. जानेवारी २००९ मध्ये बोईंगबरोबर यासाठी २.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. जुलै २०१६ मध्ये आणखी चार P-8I विमानांसाठी १.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला. ती विमाने या डिसेंबरपासून मिळायला सुरुवात होतील. आता आणखी सहा P-8I विमानांसाठी अमेरिकेला लेटर ऑफ रिक्वेस्ट पाठवण्यात आली आहे. हा व्यवहार १.८ अब्ज डॉलरचा आहे. त्याशिवाय भारत अमेरिकेकडून आणखी ३० प्रीडेटर बी ड्रोन खरेदी करणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी प्रत्येकी १० विमाने खरेदी करण्याची योजना आहे. जवळपास ३.५ अब्ज डॉलर्सचा हा मोठा आर्थिक व्यवहार असल्याने अजून यासंबंधी करारावर स्वाक्षरी झालेली नाही. ही मानवरहीत उड्डाण करु शकणारी सर्वात घातक विमाने आहेत. हजारो फूट उंचीवरुन लक्ष्यावर ते अत्यंत अचूकतेने प्रहार करतात.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *