
कोरोना काळात गरजूंसाठी ‘मसीहा’ ठरलेला सोनू सूद पूरग्रस्तांच्याही मदतीला धावला!
मुंबई (तेज समाचार डेस्क): अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकट काळात अनेकांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आता पुढे येत पूरग्रस्तांना मदत करत आहे. अशातच आता कोरोना काळात गरजूंसाठी मसिहा बनलेल्या सोनू सूदनंही पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे.
सोनू काही पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना मूलभूत गरजा देण्याचा प्रयत्न करत आहे. सोनू सूद चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात गरजेच्या वस्तू पाठवणार आहे. याविषयी बोलताना सोनू सूदनं म्हटलं की, कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम स्वतः तिथे उपस्थित असणार आहे. मूलभूत गरजा जसे बादल्या, ग्लास, भांडी, चटई, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवलं जात आहे.
पुरामध्ये नष्ट झालेली सर्व गावं सगळ्या प्रमुख महामार्गांपासून 20-30 किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे तिथे मदतीसाठी लागणाऱ्या गोष्टी पोहोचू शकल्या नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मुलभूत गरजेच्या गोष्टी सर्व पाठवणार आहेे. हे मदत साहित्य संपूर्ण प्रदेशातील 1000 हून अधिक घरांना पुरवलं जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक 4 दिवसात गावांमध्ये पोहचेल.
दरम्यान, पूरग्रस्त भागात जे ते शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. सोनूनं कोरोना काळातही सढळ हातानं मदत केली होती. अनेकांच्या अडचणींचं नीरसन केलं होतं आणि यावेळीही तो पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करत आहे.