सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू
मुंबई (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. या प्रकरणावरुन देशभरात प्रक्षोभ उसळा असतानाच आता हाथरस जिल्ह्यामध्येच एका सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने १० दिवसांपूर्वी बलात्कार केला होता. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. मात्र आज दुपारच्या सुमारात तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
अलीघर येथील इग्लास येथील एका घरामध्ये या मुलीला तिच्याच ओळखीतील व्यक्तीने कोंडून तिच्यावर अत्याचार केले. या मुलीची १७ सप्टेंबर रोजी सुटका करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुनीराज जी यांनी सांगितलं आहे. “एका संस्थेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या खोलीवर धाड टाकली. ही खोली या मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीचीच असल्याचे तपासामध्ये उघड झालं. या पीडित मुलीला जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार करण्यात आले,” असंही मुनीराज यांनी सांगितलं. त्यानंतर या मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र सोमवारपासून या मुलीची प्रकृती खालावत गेली आणि सोमवारी रात्री उशीरा तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केली आहे. मुलीचे वडिलांनी पोलिसांकडे ती तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या मुलीच्या नात्यातील एका १५ वर्षीय मुलाला अटक केली. या मुलाने गुन्हा कबुल केला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. “या पीडित मुलीची मावशीही या गुन्ह्यामध्ये सहभागी होती. ती सध्या फरार असून १५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,” असं मुनीराज म्हणाले.
मंगळवारी या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला. त्यांनी मुलीचा मृतदेह रस्त्यामध्ये मध्यभागी ठेऊन पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना आधी अटक करावी मगच अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी भूमिका घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांना लवकरात लवकर अटक केली जाईल आणि न्याय मिळून दिला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणामध्ये इग्लास पोलीस स्थानकाच्या स्टेशन अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांनी फरार महिला आऱोपीला अटक करण्यासाठी दोन टीम तयार केल्या आहेत. मानवतेस काळिमा फासणाऱ्या हाथरसमधील १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमत असतानाच अशाच प्रकारचे हे प्रकरण समोर आलं आहे.