
धक्कादायक : मालेगावात आतापर्यंत 42 पोलिसांना कोरोना
धक्कादायक : मालेगावात आतापर्यंत 42 पोलिसांना कोरोना
नाशिक (तेज समाचार डेस्क) :कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता कोरोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मालेगावमध्ये वळविण्यात आला आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या २६० च्या घरात पोहोचली आहे. मालेगावमध्ये २३ मार्चपासूनच पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. मालेगावची आर्थिक, सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमी ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे मालेगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून येताच, येथे बंदोबस्त वाढविण्यात आला. आजमितीस मालेगावमध्ये १८०० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग या सुद्धा मालेगावमध्ये मुक्कामी आहेत._
_काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये कोरोनाची लागण झालेला एक कर्मचारी आढळून आला. या कर्मचाऱ्याची पत्नीही कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, जालना येथून बंदोबस्तासाठी आलेल्या एसआरपीएफच्या एका तुकडीतील स्वयंपाक्याला कोरोनाची लागण झाली. या पोलीसांची तपासणी केली असता कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा वाढला. आतापर्यंत *एसआरपीएफच्या २४ तर मालेगाव पोलीस दलातील १८ अशा एकूण ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.* याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सांगितले की, ‘एसआरपीएफच्या एकूण सात तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यातील एका तुकडीत कोरोनाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. अतिजोखमीच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्याचे स्वॅब घेण्यात आले असून, इतरांना क्वारंनटाइन करण्यात आले आहे.’ एका तुकडीत ६५ ते ७० कर्मचारी आणि त्यांना मदत करणारे किमान १० कर्मचारी असा ताफा असतो. दरम्यान, जिल्हा ग्रामिण पोलीस दलातील अनेक कर्मचारी हे नाशिक येथील रहिवासी आहेत. अनेक जण आतापर्यंत मालेगाव येथे ये-जा करत होते. परंतु, या सर्वांना तेथे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस दलात कोरोनाचा फैलाव हा चिंतेचा विषय असला तरी, त्यावर मात करून काम सुरू असल्याचे आणि त्यासंबंधी उपाययोजना राबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.