
शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकीत उदयोन्मुख व बहुचर्चित डेटा सायन्स शाखेच्या पदवी स्तरीय शिक्षणास मान्यता
शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकीत उदयोन्मुख व बहुचर्चित डेटा सायन्स शाखेच्या पदवी स्तरीय शिक्षणास मान्यता
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयास संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील उदयोन्मुख व बहुचर्चित *डेटा सायन्स* या शाखेच्या पदवी स्तरीय शिक्षणाला सुरु करण्याची मान्यता मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील यांनी दिली. तांत्रिक शिक्षणातील अद्ययावत व आधुनिक ज्ञान आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या साठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे कायमच प्रयत्नशील आहे. याचाच परीपाक म्हणून महाविद्यालयाने काळाची गरज ओळखून अभियांत्रिकी पदवी साठी ‘डेटा सायन्स’मध्ये स्पेशलायझेशन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मुळे परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर विशेष मागणी व महत्व तसेच सध्या सर्वत्र चर्चित असलेल्या या विषयात करिअर करण्याची संधी प्राप्त होणार असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहनही प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील यांनी केले आहे.
डाटा सायन्स ही आजच्या अत्याधुनिक व विकसित तंत्रज्ञान जगतातील एक नवीनतम संकल्पना आहे. सध्या संगणकाच्या एका क्लिकवर सर्व जग येऊन ठेपले असून यामुळे ई-कॉमर्सपासून अन्य विविध क्षेत्रांत विविध प्रकारचे युजर्स वावरत असतात. या सर्व युजर्सच्या ऑनलाइन वावरण्याचा अभ्यास करून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे डाटा सायन्स . या माहितीचा वैज्ञानिक व शास्रोक्त संशोधन व अभ्यास करून त्या द्वारे मिळणाऱ्या निष्कर्षा चा उपयोग व्यवसायाला , उद्योगाला व त्याच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा त्या संबंधी महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी होऊ शकतो. नवीन प्रोडक्ट, व्यवसाय, उपक्रम , जाहिरात, वाहन, शिक्षण या सारख्या विषयापासून अगदी दैनंदिन जीवनातील अनेक निर्णयासाठी डेटा सायन्स चा अभ्यास उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस होणारी उत्क्रांती आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या डेटा निर्मितीमुळे जगभरातील डेटा सायंटिस्ट्सची मागणी वाढत आहे. डेटा एकत्रित करणे आणि संग्रहित करणे उद्योग समूहांसाठी एखाद्या विशिष्ट उद्योगातील कल प्रभावित आणि निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असुन त्या द्वारे उद्योगातील सक्षमीकरण होऊ शकते. डाटा सायन्स हे गणित, प्रोग्रामिंग, आकडेवारी आणि डिझाइन यांचे एकत्रीकरण असुन त्याद्वारे डेटा संग्रह यशस्वीपणे व्यवस्थापित केला जातो.
द हिंदू ह्या वृत्तपत्राच्या एका सर्वेक्षणानुसार मागील वर्षी जवळपास प्रत्येक उद्योगात डेटा अॅनालिटिक्सच्या वापरामुळे डेटा सायन्सशी संबंधित एकूण रोजगारांमध्ये 45% वाढ झाली असून ई-कॉमर्स, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स, हेल्थकेअर, ट्रान्सपोर्ट, सायबर सिक्युरिटी, जेनोमिक्स, ऑटोमोटिव्ह इ.क्षेत्रात डेटा सायंटिस्टची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात बिग डेटा इंजीनियर, डेटा इंजीनियर / डेटा आर्किटेक्ट, डेटा सायंटिस्ट, स्टॅटिस्टिशीयन, डेटा अॅनालिस्ट, व्यवसाय विश्लेषक इत्यादी पदांवर डेटा सायन्स मधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले विद्यार्थी उच्च वेतनश्रेणी मिळवून काम करू शकतात. भविष्यात या क्षेत्रात सेवेच्या व नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून महाविद्यालयाने अभियांत्रिकी पदवी साठी ‘डाटा सायन्स’ शाखा सुरु केलेली आहे. काळाची गरज व विद्यार्थ्याचा कल लक्षात घेऊन महाविद्यालयाने नवीन शाखा सुरू केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक तपनभाई पटेल यांनी समाधान व्यक्त केले आहे.
