
शिरपूर ब्रेकिंग : पुन्हा आढळला कोरोना रुग्ण- रूग्णांची संख्या 9
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथील प्रलंबित १३ अहवालांपैकी भाटपुरा, ता. शिरपूर येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला असून उर्वरित ११ अहवाल निगेटिव्ह आहे तर एक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८२ रुग्ण
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू तर ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, धुळे महानगरपालिका हद्दीत १८ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत २२ मे २०२० पासून ते ३१ मे २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.