
गुजरातचे मुख्यमंत्री झाले सेल्फ क्वारंटाईन
गांधीनगर (तेज समाचार डेस्क) : जरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी स्वतःहून विलगीकरण पद्धतीने घरातच राहण्याचा (सेल्फ क्वारंटाईन) निर्णय घेतला. विजय रुपानी यांनी काँग्रेसचे राज्यातील आमदार इम्रान खेडावाला यांची मंगळवारी भेट घेतली होती. इम्रान खेडावाला यांनाच कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विजय रुपानी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली होती. त्याला इम्रान खेडावाला उपस्थित होते. या बैठकीनंतरच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुपानी यांनी घरातच स्वतःचे विलगीकरण करून घेतले.
विजय रुपानी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. डॉ. अतुल पटेल आणि डॉ. आर के पटेल या दोघांनीही विजय रुपानी यांची बुधवारी सकाळी तपासणी केली. त्यांच्यामध्ये सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. पण केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.