बालकाला अनवाणी बघून रेल्वे अधिकार्‍याने स्वत: दिली चप्पल ! जबलपूर ‘आरपीएफ ’ चमकले

Featured देश
Share This:

जबलपूर (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या कामगारांसाठी रेल्वे विभागाने श्रमिक विशेष गाड्यांची व्यवस्था केल्याने हजारो कामगार दररोज आपल्या गावी परतत आहेत. यामध्ये काही कामगारांची स्थिती खूपच दयनीय आहे. त्यांचे हाल पाहून कोणाचेही मन विचलित होऊ शकते. मध्यप्रदेशातील जबलपूर रेल्वे स्टेशनवर अनवाणी पायाने उतरलेल्या एका  लहान मुलाला पाहून तेथील आरपीएफचे पो. स्टे. प्रमुख विरेंद्र सिंग यांचेही मन असेच विचलित झाले आणि त्यांनी  १७ मे रोजी रेवा येथे जाणारी ट्रेन नं – ०६१६४ येथे आल्यावर त्याच्यासाठी चप्पल मागवून मनाच्या मोठेपणाचे तसेच मानवतेचेही दर्शन घडवले. उन्हापासून संरक्षणासाठी छत्री आणि अन्य प्रवाशांना दुपट्टा तसेच जे अनवाणी होते त्यांच्यासाठी सुमारे १०० चप्पलचे जोड मागवले.  यावेळी त्या प्रवाशांना झालेला आनंद आणि त्यांच्या चेहर्यावरील भाव शब्दात मांडता येणार नाही. त्यावर काही मुले म्हणाली की, ‘पैरों को अच्छा लग रहा है अंकल!’

विरेंद्रसिंग यांनी त्या मुलाला थांबवून केलेली त्याची चौकशी आणि चप्पल त्याला देण्याची घटना कुणीतरी शूट केली होती. तो मुलगा आपल्या परिवारासोबत पुढे निघून गेला, आणि काही काळानंतर हा संपूर्ण व्हिडिओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शेअर केल्याने या मानवतापूर्ण घटनेची सर्वांना माहिती झाली आणि विरेंद्र सिंग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

कर्मचार्‍यांचा आहे अभिमान

रेल्वेमंत्री गोयल यांनी व्हिडिओ शेअर करीत म्हटले आहे की, कोरोना संकटाच्यावेळी स्टेशनवर सज्ज असलेले आरपीएफचे जवान प्रवाशांच्या सेवा आणि सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटत आहेत. अशा स्थितीत जबलपूर स्टेशनवर कष्टकरी मुलाला अनवाणी पाहून आरपीएफच्या अधिकार्याने मानवता दाखवत चप्पल दिल्याने मी खुश आहे. मला अभिमान आहे की, आमचे जवान सेवाभावाने आपली ड्युटी करीत आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांचे डोळे आले भरून

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये राहणारे कामगार सध्या विशेष ट्रेनने जबलपूरला परत येत आहेत. स्टेशनवर उतरणार्‍या या कामगारांची अवस्था पाहून मनाची घालमेल होते. गुरूवारी असेच झाले. मुंबई ते पनवेलपासून रेवा येथे जाणारी ‘मजदूर स्पेशल ट्रेन’ दुपारी १२ च्या सुमारास जबलपूरला पोहचली. या गाडीने सुमारे ३५० लोक जबलपूर स्टेशनवर उतरले. यामध्ये ४ ते ८ वर्षाच्या आतील खूप मुले अशी होती, जे जबलपूरपर्यंत अनवाणी पायी आले होते. त्यांनाच विरेंद्र सिंग यांनी चप्पल मागवून दिली. हे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांचे डोळे भरून आले.

रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यासंदर्भात विरेंद्र सिंग यांचे कौतुक सुध्दा केले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ लाख ३० हजारांहून अधिक लोकांनी आपली पसंती दिली आहे. तसेच मिनिस्टरी ऑफ रेल्वेच्या ट्विटरवर देखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला तर तेथे देखील सुमारे १० लाख ५० हजारांवर लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

सायबर लोकेशनच्या मदतीने सोने जप्त

विरेंद्र सिंग यांचे नोकरी काळातील अनुभवही खूप विलक्षण आहेत. अनेकदा जीवावर उदार होऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. एकदा जबलपूरला मुंबईच्या एका व्यापार्याचे २ किलो सोने चोरीस गेले होते. ही घटना आहे ९ नोव्हेंबर २०१८ ची. त्यात आरोपी चोर मुंबईहून इटारसीपर्यंत पोहचले होते. इटारसीहून इंटरसिटी एक्सप्रेसने ते जबलपूरला आले. मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमने जोगोजागी त्यांचा शोध घेतला असता सायबर लोकेशनच्या मदतीने ते जबलपूरमध्ये असल्याचे आढळले. त्यांना पकडले असता ते युवक रेवा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यांनी मुंबईहून सोने चोरले होते. त्यांची किंमत सुमारे ६० लाख रू. होती. आरपीएफ पो. स्टे. प्रमुख विरेंद्र सिंग मुंबईवरून आल्यावर त्यांनी सायबर लोकेशनच्या मदतीने चोर आणि सोनेही ताब्यात घेतले होते.

रेल्वे आणि ‘सेवा भारती’तर्फे भोजन व्यवस्था

जबलपूर स्टेशनवरून येणार्या विशेष ट्रेनने मजुरांसाठी ‘सेवा भारती’च्या सहयोगाने १० मे रोजी दुपारी २०० ते ३०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था तसेच पाणी पाऊच, बिस्किटे आणि आवश्यकते नुसार लागणार्या वस्तूची पूर्तता करण्यात आली. यावेळी पश्चिम मध्य रेल्वे जबलपूरच्या महिला कल्याण संस्थेच्या अर्चना सिंह आणि अन्य सदस्यांच्या माध्यमातून संचालित ‘सर्व सामान्याचे स्वयंपाक घर’ द्वारे तसेच महिला अधिकार्यांच्या सहयोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सेवा भारती’तर्फे जबलपूर येथे ५० व्यक्ती आणि ३५ महिलांना १ महिना पुरेल अशी अन्नाची पाकिटे तसेच दररोज वापरासाठी लागणारे १,००,००० वर साहित्य वाटप करण्यात आले. आजवर सुमारे २८ हजार जेवणाची पाकिटे त्यांनी स्टेशनजवळील परिसरात राहणार्या लोकांना वाटले आहे. विरेंद्र सिंग यांनी रेल्वेसोबतच ‘सेवा भारती’आणि रा. स्व. संघ यांच्या साहाय्याने अनेकांना सदैव मदतीचा हात दिला आहे.

– मिनल खैरनार

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *