आता महाराष्ट्रातच रेमडिसिवीर निर्मिती; नितीन गडकरींचा पुढाकार

Featured महाराष्ट्र
Share This:

 

वर्धा (तेज़ समाचार डेस्क): महाराष्ट्रात शनिवारी ६७ हजार कोरोना (Corona) रुग्ण आढळले. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. राज्यात रेमडिसिवीर (Remdesivir) आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडिसिवीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रयत्न केले आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णात भर पडत आहे. यामुळे रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. आता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनी रेमडिसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. देशभरात रेमडिसिवीर हे औषध तयार करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. यात वर्ध्यातील आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहे. कंपनीला उत्पादनासाठी परवानगी मिळणे वर्धा जिल्हा वासियांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.

गडकरींचा पुढाकार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमडिसिवीर यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीला रेमडिसिवीर उत्पादन निर्मितीस परवानगी मिळावी, यासाठी गडकरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे प्रमुख संशोधक आणि वैज्ञानिक डॉ. एम. डी. क्षीरसागर आहेत. कंपनीत लाइफ सेव्हिंग ड्रग्ज क्रिटिकल केअर इंजेक्शन्स, अँजिओग्राफीमध्ये वापरली जाणारी उत्पादने, सीटी स्कॅन, एमआरआय आणि आणीबाणीच्या वापरासाठीची उत्पादने बनवली जातात.

या कंपनीत लवकरच रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरू होणार आहे. रोज 30 हजार व्हायल तयार करण्याचा दावा केला जात आहे. ही बाब सर्वांनाच दिलासा देणारी ठरणार आहे. संकटाच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचाराला मानणाऱ्या जिल्ह्यात होणारी औषध निर्मितीसाठी महत्वाची ठरणारी आहे. रेमडीसीवर उत्पादनात देशाला याचा फायदा होणार आहे. यामुळे रुग्णाचे जीव वाचण्यास मदत होणार आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *