रत्नागिरी : महामार्गावरील डिझेल चोरी करणारी टोळी ताब्यात

Featured महाराष्ट्र
Share This:

 

रत्नागिरी(तेजसमाचार प्रथिनिधी): महामार्गावर उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमधील डिझेल चोरणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मुंबई ते गोवा तसेच रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावर असणारे पेट्रोलपंप, धाबे, हॉटेल या राज्यातील आणि परराज्यातील मालवाहतूक करणारे ट्रक, डंपर तसेच अवजड वाहनांवरील चालक जेवण आणि विश्रांतीकरिता थांबले असताना वाहनाच्या डिझेल टाकीवरील लावलेले लॉक आणि मीटर बोर्डाचे स्क्रू काढून टाकत डिझेल चोरले जात होते. अशा चोरीच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या होत्या. गेल्या ५ फेब्रुवारीला निवळी येथील शांती पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून अशा पद्धतीने डिझेल चोरले जात होते. त्याबाबतची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली असता चोरटे ट्रकमधून येऊन चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

अनेक ठिकाणच्या घटनांबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित ट्रकची माहिती पोलिसांनी मिळविली. तसेच या ट्रकच्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी जयपूर, राजस्थान, चंदीगड, हरियाना, मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या ट्रकबाबत माहिती घेण्यात आली. संशयित ट्रकपैकी एक ट्रक करबुडे येथे शांती हॉटेलच्या आवारात उभा असल्याचे दिसल्यावर पोलिसांनी त्या ट्रकची तपासणी केली असता ताडपत्रीखाली ३५ लिटरचे २२ प्लास्टिकचे कॅन आणि इतर साहित्य आढळून आले. यामधील फारूख बच्चू खान, जफर हनिफ, जितेंद्र शर्मा, इकलाक मसुरी आणि हुकुमसिंग पटेल हे मध्य प्रदेशमधील आरोपी असून त्यांच्याकडून साहित्य आणि माल जप्त करण्यात आला.या टोळीने आणखी अनेक ठिकाणी चोरी केली असल्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपअधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी ही कारवाई केली.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *