पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!
पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!
पुणे (तेज समाचार डेस्क): नुकतंच महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय अभासक्रमाच्या प्रवेशसाठी 70/30 टक्के कोट्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय प्रवेशासाठी एकमेकांशी स्पर्धा होणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मेडिकल प्रवेशसाठीचा कट ऑफ वाढणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर आणि वैधानिक विकास महामंडळाच्या रचनेनुसार महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिकल प्रवेशाच्या जागांसाठी 70/30 चा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र विधीमंडळात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांच्या कोट्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना जास्त जागा उपलब्ध होत होत्या. शिवाय विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई या ठिकाणच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत होता. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही त्याच्या भागातील महाविद्यालयांतील प्रवेशावर समाधान मानावं लागत होतं. मात्र आता सर्व विद्यार्थी समान पातळीवर गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे नामांकित अनुदानित महाविद्यालयांचा कटऑफ सुमारे 25 गुणांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.