
पुणे: 3 दुकाने फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
पुणे: 3 दुकाने फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
पुणे (तेज समाचार डेस्क): अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी परिसरातील तीन दुकाने फोडून तीन लाख 76 हजार 476 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीच्या घटना बुधवारी (दि. 26) पहाटे घडल्या आहेत. बगदाराम जयसाजी पुरोहित (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी तीन ते चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळकर कॉम्प्लेक्स हिंजवडी येथील राज मोबईल शॉपी हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातून 81 हजार रुपयांचे मोबईल फोन चोरून नेले.
त्यानंतर हिंजवडी मारुंजी रोडवरील अभिषेक अजय पवार यांच्या ऑफिसच्या बाथरूमचे ग्रील तोडून चोरट्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसमधून नऊ मोबईल फोन, चार लॅपटॉप, 10 चांदीचे कॉईन, एक एलसीडी असे एकूण दोन लाख 45 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. अज्ञात चोरट्यांनी तिसरी चोरी शिंदेवस्ती मारुंजी येथे केली. शेषराम सुजाराम चौधरी यांच्या प्रिन्स मार्ट स्टेशनरी अॅंड गिफ्ट शॉप या दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातून 50 हजार रुपयांचे गिफ्ट व स्टेशनरी साहित्य, किराणा माल चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.