
‘खान्देश’चा गौरवः अंतराळ वीरांगना अनिमा पाटील-साबळे !
(अनिमा पाटील-साबळे या ‘नासा’मध्ये कार्यरत असून त्यांनी तेजसमाचार प्रतिनिधि – मिनल खैरनार – minal111996@gmail.com हिच्याशी साधलेला संवाद)
आपल्याला कोरोनामुळे एक संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करा. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले जात नाही. आता आपल्याला ही संधी चालून आली आहे. त्या संधीचा उपयोग सत्कारणी लावा. कुटुंबाला वेळ द्या. कुठे काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करा. आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या. छोट्या-छोट्या गोष्टीत सर्वांसाठी आनंद शोधा. आपल्या घराच्या परिसरात जागा असेल तर ही वेळ बागकाम करण्यासाठी चांगली आहे. तसेच घरी बसून होणार नाही तर आपल्या आरोग्याची निगा ठेवा. आरोग्य सुदृढ हवे म्हणून योगा व व्यायाम करा. या संकटाला आपण न घाबरता सामोरे जाणे आवश्यक आहे. माझ्या घरीसुद्धा मी या सर्व गोष्टींचे पालन करीत आहे. तुम्हाला सुरक्षित रहायचे असेल तर घरी रहा, सुरक्षित रहा असा मोलाचा संदेश तिसरी भारतीय अंतराळ वीरांगना होतकरू आणि खान्देशचा गौरव ठरणार्या अनिमा पाटील-साबळे यांनी संवाद साधताना दिला.
भारतातील तिसर्या अंतराळवीर असलेल्या अनिमा पाटील-साबळे यांनी ‘नासा’मध्ये केपलर मिशनवर याअगोदर 3.5 वर्षे काम केले आहे. यापूर्वी भारतातील कल्पना चावला, सुनिता विल्यम्स नंतर भारतीय वंशाच्या अनिमा पाटील-साबळे तिसर्या महिला अंतराळवीर होतकरू आहेत. विशेष म्हणजे, त्या जळगावच्या आहेत. अनिमा पाटील सद्धया नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेत ओरायन स्पेसक्राफ्ट सिम्युलेशन्स लॅब मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.
अंतराळ प्रवासाची अशी मिळाली प्रेरणा
त्या 7 वर्षाच्या असताना त्यांची शाळा असलेल्या सेंट जोसेफ कॉन्वेंटमध्ये पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात त्यांना अंतराळवीर, रॉकेट्स, स्पेसीकॅरॅफ्ट्स, यांचे फोटो असलेले एक पुस्तक मिळाले. त्याच दिवशी त्यांनी मनात ठरविले की, आयुष्यात काही करायचे असेल तर ते हेच – मी अंतराळवीर होणार. त्यांनी निवडलेला प्रवास अत्यंत खडतर होता परंतु त्यांना तो पूर्ण करायचाच होता, असे त्या सांगतात. त्यावेळी त्यांचे प्रेरणास्थान होते- ते म्हणजे भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. त्यांच्याप्रमाणे मी आधी लढाऊ विमान वैमानिक होईल आणि नंतर अंतराळवीर असे त्यांनी ठरविले होते. शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांची ओळख होती. अभ्यासासोबत त्या संगीत, नृत्य, भाषण इत्यादीतही नेहमी सहभागी होत. लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याकरिता इंजिनिअरची किंवा भौतिकशास्त्राची पदवी आवश्यक होती. परंतु त्यांच्या वडिलांनी सांगितले होते की, शिक्षण घरूनच पूर्ण करावे. त्यामुळे इंजिनिअर होणे अशक्यच होते. त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेण्याचे ठरविले. तसेही त्यांचा भौतिकशास्त्र हा आवडीचा विषय होता. त्यांनी ही पदवी गुणवत्तेसह मिळवली. परंतु जेव्हा त्या वैमानिकासाठी अर्ज करण्याकरिता गेल्या तेव्हा त्यांना कळले की, त्यासाठी फक्त पुरुषच अर्ज करू शकतात. परंतु त्यांचा मनाशी निश्यच ठाम होता. त्यांनी तरीही अर्ज करण्याचे ठरवले. परंतु अर्ज करण्यासाठी अजून एक अट, वैमानिक होण्याकरिता दृष्टी अत्यंत उत्तम हवी असते आणि त्यांना हलक्याश्या नंबरचा चष्मा होता. म्हणून त्या अर्ज करू शकल्या नाही . त्यामुळे त्या खचल्या. मला माझे सर्व संपल्यासारखे वाटले. काय करावे समजत नव्हते असे सांगून त्या म्हणाल्या, मला पुढे भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे नव्हते.
एमसीएने दिली साथ
त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्यांना एमसीए (मास्टर इन कम्प्युटर अँप्लिकेशन्स ) करण्यास सुचवले. जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमसीए- कोर्सकरिता फक्त 30 जागा होत्या. त्यांना लग्नासाठी स्थळे येत होती . परंतु त्यांच्या आईने त्यांना याप्रसंगी साथ दिली आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पती दिनेश हे विद्यापीठात त्यांचे सिनियर होते. त्यांनी मागणी घातली त्यानंतर लग्न झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी मुंबई येथे काही दिवस नोकरी केली. अडीच वर्षाच्या नोकरीनंतर त्यांना युएसमध्ये नोकरीची संधी मिळाली आणि मार्च 2000 मध्ये दोघेही सॅनहोजे कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले. सॉफ्टवेयर मध्ये नोकरी करत असतांना त्यांना नासा त्यांच्या जवळ असल्याचे माहित झाले , स्पेस शटल्स हि तेव्हा सारख्या लाँच होत होत्या , त्यांनी स्वप्नासाठी पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी परत मास्टर पदवी मिळविण्याचे ठरविले. -एरोस्पेस इंजिनियरिंग सॅनहोजे विद्यापीठात त्यांनी पूर्ण केले. याकाळात त्यांना दुसरा मुलगा झाला. 2010 मध्ये त्यांनी पदवी पूर्णवेळ घर, मुले, नोकरी आणि शिक्षण सांभाळून 3.4/4 ॠझ मिळवून पूर्ण केले . दरम्यान, या काळात त्यांनी अनेकवेळा नासा मध्ये अर्ज केला परंतु यश मिळत नव्हते. 2012 मध्ये ‘नासा’कडून त्यांना बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली. तेव्हापासून आजपर्यंत बालपणीचे स्वप्न अगदी काही अंतरावर असल्याची जाणीव ठेवून त्यांनी आयुष्याची वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे. ‘नासा’त काम करण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वाला प्राधान्य दिले जात असल्याने अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकाले आहे.
पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेण्याचे मिशन
त्या वेळेस ‘नासा’मध्ये अनिमा आकाशगंगेतील सूर्यासारख्या तार्यांभोवती त्यांच्या कक्षेत असलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेण्याच्या मिशनवर कार्यरत होत्या. केपलर ही आकाशात सोडलेली मोठी दुर्बीण आहे. आपल्यासारखी दुसरी पृथ्वी या आकाशगंगेत आहे का, याचाही नासा शोध घेत होते . केप्लर ने घेतलेल्या तारे आणि ग्रहांचे छायाचित्र प्रोसेसिंग करणार्या सॉफ्टवेयर वर अनिमा काम करत होत्या , नासा च्या सुपरकॉम्पुटर वर हि त्यांना काम करायला मिळाले. अनिमा स्कुबा डायवर आणि स्टुडन्ट पायलट हि आहेत, असे सांगून अनिमा म्हणतात, 2015 मध्ये नासा च्या जॉन्सन स्पेस सेन्टर मध्ये हेरा आणि 2018 मध्ये मार्स डेसर्ट रिसर्च स्टेशन येते मंगल मिशन च्या सिम्युलेशन साठी त्यांची कमांडर म्हणून निवड झाली. अंतराळवीर मंगळावर कसे राहणार कसे काम करणार याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन्स होते.
‘नासा’चा अनुभव अभूतपूर्व
‘नासा’चे अनुभव सांगताना त्या म्हणतात, नासाचे सर्व सेन्ट्रल टेलीवर्कवर आहेत. नासा सेण्टरवर फक्त मिशनवर असणार्या लोकांना आत येण्याची परवानगी. स्पेस स्टेशनवर असलेल्या अंतराळवीरांना सम्पर्क करत राहण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी मिशन कंट्रोल सेंटर चे लोक ऑफिस मध्ये जात आहेत. नुकतेच क्रीस कॅसिडी आणि दोन रशियन ऍस्ट्रोनॉटस स्पेस स्टेशनकडे लॉच झाले आणि तेथे सुखरूप पोहचलेही. याआधी स्पेस एक्सचे ड्रेगन स्पेसक्राफ्ट जे स्टेशनवर होते ते कार्गो घेऊन पुन्हा पृथ्वीवर आले. स्पेस एक्सचा नासासोबत 20 कार्गो फ्लाईटसच्या कॉन्ट्रॅक्टची ही शेवटची यशस्वी फ्लाईटस पूर्ण झाली. मार्च 31ला नासाचे 4 वर्षांनतर पुन्हा ऍस्ट्रोनॉट अँप्लिकेशन उघडलेले. अंतराळवीर होण्यासाठी -अंतराळवीर स्पेस स्टेशन कडे लाँच होणार आहेत , त्याचीही तयारी नासा मध्ये सुरु आहे . तर असे नासा मध्ये या कॉरोनॅव्हिर्स च्या कठीण काळात ही कामे सुरु आहेत.
कोरोनावर मात करायची असेल तर
कोरोना संबंधित लढाई यशस्वी होण्यासाठी लोक स्वत:ची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत आहेत, घरात रहात आहेत, नियमांचे पालन करीत आहे. यामुळे लढाई नक्कीच यशस्वी होईल. ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही त्यांच्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कोरोनाविरूध्द लढाई यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन, घरीच राहून प्रशासनास सहयोग आणि सहकार्य करायला हवे. जसा उन्हाळा येईल आणि तापमान वाढेल तशी या व्हायरसपासून आपली सुटका होईल. निष्काळजीपणा चालणार नाही. स्वच्छतेचे पालन करावे लागेल.