
नंदुरबार शहरात करोना विस्फोटाची दाट शक्यता ?
नंदुरबार शहरात करोना विस्फोटाची दाट शक्यता ?
जेवण बनवणारा पॉझिटिव निघाल्याने नंदुरबारच्या नगरसेवकाकडील जंगी पार्टीला गेलेल्यांचे धाबे दणाणले?
नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोना प्रसार होऊ नये म्हणून शासनाने सामूहिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असतानासुद्धा येथील एका नगरसेवकाने मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर चक्क क्लासवन जेवणावळ दिली. परंतु या जेवणाची व्यवस्था बघणारा खानसामाच पॉझिटिव्ह निघाल्याची चर्चा पसरू लागल्याने पार्टीला उपस्थित असलेल्या सर्व बड्या मंडळींचे आणि अधिकाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.
याविषयी अधिक वृत्त असे की नंदुरबार शहरातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नगरसेवकाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. बड्या राजकीय नेत्याचा खास विश्वासू आणि पोलीस खात्यात चांगलीच उठबस असलेल्या या नगरसेवकाचे अधिकार्यांमध्ये सुद्धा विशेष लागेबांधे आहेत. परिणामी शासनाने सामूहिक कार्यक्रमांना आणि जेवणावळीला बंदी घातलेली असताना सुद्धा या महाशयांना आपल्या सर्व बड्या संपर्कातील बड्या लोकांना पार्टी देण्याचा मोह आवरला गेला नाही. समजलेल्या माहितीनुसार या नगरसेवकाने एका बड्या राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर गपचूप पणे चक्क लॉक डाऊन कालावधीत नियमांची पायमल्ली करीत जंगी पार्टी दिली. सर्व बडे अधिकारी, अनेक नगरसेवक आणि राजकीय पुढारी मिळून जवळपास तीनशे लोक उपस्थित राहिले. विशेष असे की मांसाहारी जेवण बनवण्यात तरबेज असलेला एक खानसामा सर्व बड्या लोकांचा लाडका आहे. त्यानेच फार्महाउस वरील या जेवणावळीचा मेनू बनवला होता आणि सर्व सरबराई करायला देखील तोच पुढे होता. त्याच्या हातच्या जेवणाची चव चाखून मिटक्या मारत घरी परतलेल्या त्या सर्व बड्या मंडळींची मात्र आता झोप उडाली आहे. कारण हा खानसामा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे. जेवण बनवणारा हा कारागीर कुठे उपचार घेत आहे याविषयीची पूर्ण सत्यता समोर येणे बाकी असले तरी या खानसामामुळे आता किती जणांना लागण झाली असावी आणि जेवणावळीला उपस्थित असलेल्यांपैकी कितीजणांचा जीव धोक्यात आला असावा ? हा महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे. संपूर्ण शहरात दबक्या आवाजात आज ही एकच चर्चा रंगलेली दिसून आली. मांसाहारी जेवण चांगलं बनवतो म्हणून या कारागीराने अलीकडेच शहरातील राजकीय पुढार्यांच्या घरात जाऊन, नगरसेवकांच्या आणि अधिकार यांच्या बंगल्यावर जाऊन सेवा बजावली असल्याचे कळते. जर हा पॉझिटिव्ह असेल तर त्या सर्व ठिकाणी कोणाचा प्रसार झाला काय? हा प्रश्न समोर येतो. याविषयी काही महत्त्वाच्या लोकांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास हात झटकले परंतु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर खाजगीत झालेल्या पार्टीबद्दल दुजोरा दिला. ज्यांनी कायदे नियम पाळायचे तेच अधिकारी अशा गोष्टीत सामील कसे झाले? यावर आश्चर्यमिश्रित संतप्त भावना व्यक्त होत आहेत. साधे डबल सीट बसून जाणाऱ्या सामान्य मजुरांकडून दंड वसूल करणाऱ्या प्रशासनाला याची भनक का लागली नाही? सामूहिक जेवणावळी देण्याचा महा प्रताप करणाऱ्या संबंधित नगरसेवकावर कारवाई होणार की अधिकारी मूग गिळून बसणार? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.