शाळा सुरु करण्याचे नियोजन

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा (School) सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याने राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

मुलांच्या भविष्यासाठी घेतले जातील ठोस निर्णय
याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, भाषा विषयातील स्वाध्याय उपक्रमातून, दिक्षा ऍपच्या माध्यमातून, गुगल, गृहभेटी, सह्याद्री, दूरदर्शनसह अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, ज्यांच्याकडे काहीच साधने नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा हाच पर्याय आहे. या पार्श्‍वभूमीवर नववी ते बारावीनंतर आता 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर पुन्हा पालकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीचे वर्ग थोडे उशिराने सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु, पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार असून तत्पूर्वी, सर्व शिक्षकांची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट केली जाणार आहे. शाळांचा परिसर स्वच्छ करुन वर्गखोल्या सॅनिटाइज केल्या जाणार आहेत. मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काही तासांपुरतीच शाळा भरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. शाळा सुरु केल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना त्याठिकाणी केल्या जाणार असून जेणेकरुन पालकांचा विश्‍वास वाढण्यास मदत होईल, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात राज्यभर आदेश पारित केले जाणार आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *