पिंपरी-चिंचवड: मागील तीन महिन्यात 200 वाहनांची चोरी

Featured पुणे
Share This:

पिंपरी-चिंचवड शहरातून मागील तीन महिन्यात 200 वाहनांची चोरी

पिंपरी (तेज समाचार डेस्क): जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 या तीन महिन्यांमध्ये 178 दुचाकी, 6 तीनचाकी आणि 16 चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. तर मागील तीन महिन्यात केवळ 27 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहन चोरीच्या गुन्हे दाखल होण्यात आणि उघडकीस येण्यामध्ये एवढी मोठी तफावत असल्याने शहरातील वाहन धारकांमध्ये वाहनांच्या बाबतीत असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून 51 दुचाकी, दोन तीनचाकी आणि पाच चारचाकी अशी एकूण 58 वाहने चोरीला गेली आहेत. याच महिन्यात दुचाकी चोरीचे दहा आणि चारचाकी चोरीचे दोन असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. तीनचाकी वाहन चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आला नाही.

जुलै महिन्यात 47 दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने तीन आणि सात चारचाकी अशी एकूण 57 वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जुलै महिन्यात दुचाकी चोरीचे सहा, तीनचाकी चोरीचा एक आणि चारचाकी चोरीचे दोन असे केवळ नऊ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ऑगस्ट महिन्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यात भरमसाठ वाढ झालेली आहे. या महिन्यात 80 दुचाकी, एक तीनचाकी आणि पाच चारचाकी अशी एकूण 86 वाहने चोरीला गेली आहेत. तर दुचाकी चोरीचे केवळ सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. तीनचाकी आणि चारचाकी वाहन चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही.

मागील तीन महिन्यात 200 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. हा आकडा केवळ पोलीस रेकोर्डवरील आहे. अनेकजण वाहन चोरीला गेल्यानंतर काही कारणांमुळे पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे टाळतात. त्यामुळे प्रत्यक्षात वाहन चोरीचा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी ‘वाहन चोरी विरोधी पथक’ या विशेष पथकाची निर्मिती केली होती. या पथकात सात कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी होते. मात्र, कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहन चोरी विरोधी पथकासह अन्य विशेष पथके बरखास्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची मोठी व्याप्ती आणि त्या प्रमाणात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता.

वाहन चोरी विरोधी पथकांनी अनेक किचकट गुन्ह्यांचा उलगडा केला होता. परराज्यातून देखील चोरीची वाहने या पथकाने जप्त केली होती. ऑगस्ट महिन्यात वाहन चोरीच्या वाढलेल्या गुन्ह्यांमुळे या पथकाची पुन्हा एकदा गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *